ठाणे महापालिकेतील साहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून त्यासंबंधीचे आदेश महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी मंगळवारी दिले. या बदल्यानुसार, महापालिका सचिव पदाचा कार्यभार उथळसर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अशोक बुरपुल्ले यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच घनकचरा विभागाचाही अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. महापालिका सचिव मनीष जोशी यांची कार्मिक अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी कर निर्धारक व संकलकपदी वर्षां दीक्षित, उथळसर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तपदी दयानंद गोरे, मुंब्रा सहाय्यक आयुक्तपदी सागर घोलप यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका मुख्यालय उपायुक्त संदीप माळवी यांनी दिली.