देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई नगरीचे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र म्हणून विकसित करण्याची घोषणा यूपीए सरकारने केली होती, पण केंद्रातील भाजप सरकारने वित्तीय केंद्रासाठी मुंबईच्या आधी गुजरातला पसंती दिली आहे. नव्या आर्थिक वर्षांत म्हणजेच १ एप्रिलपासून हे केंद्र कार्यांन्वित करण्याची योजना आहे.
नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यापासून त्यांचे गुजरात प्रेम लपून राहिलेले नाही. पालघरजवळील सुरक्षा विषयक केंद्र पोरबंदरला हलविण्यात आले होते. तसेच रिझव्‍‌र्ह बँकेचे काही विभाग नवी दिल्लीत हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. यावरून केंद्रातील भाजप सरकारवर शिवसेनेनेही टीका केली होती.
गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’
आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातमध्ये सुरू करण्यात येणार असून, साऱ्या शासकीय यंत्रणांना त्याला मान्यता दिली आहे. गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’ मध्ये हे वित्तीय केंद्र सुरू करण्यात येणार असून, दुबई आणि सिंगापूरमध्ये स्थलांतरित झालेला वित्तीय व्यवसाय गुजरातमध्ये यावा, या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. वित्तविषयक सारे व्यवहार या केंद्रातून होणार आहेत. या केंद्रातील सारे व्यवहार हे डॉलर्समधून व्हावेत यावर भर देण्यात येणार आहे.
मुंबई महानगर विभागाच्या विकासाला गती देण्याच्या उद्देशाने येत्या शुक्रवारी मुंबईत ‘मुंबई नेक्स्ट’  या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा, मुकेश अंबानी, सायरस मिस्त्री, अमिताभ बच्चन यांच्यासह उद्योग व चित्रपट क्षेत्रातील नामवंतांना निमंत्रित करण्यात आले आहे.
 मुंबईला आर्थिक, व्यापारी आणि मनोरंजन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या उद्देशाने ‘मुंबई नेक्स्ट’ हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. या पाश्र्वभूमीवर आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबईच्या आधी गुजरातमध्ये सुरू होत आहे हे महत्त्वाचे ठरणार आहे.