विशेष कृती गटाच्या बैठकीतील निर्णय; पुढील वर्षी बांधकामाला सुरुवात
गुजरातमधील ‘गिफ्ट’ला पूरक आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (आयएफएससी) वांद्रे-कुर्ला संकुलात उभारले जाणार असून त्याचे बांधकाम कोणत्याही परिस्थितीत पुढील वर्षी सुरू करण्यात येईल आणि ते २०१९ मध्ये पूर्ण होईल, असे आयएफएससीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष कृती गटाच्या उपाध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. केंद्राचा आराखडा तयार करण्यासाठी २५ कंपन्यांनी आतापर्यंत रस दाखविला असून त्यापैकी १० विदेशी आहेत. आराखडय़ासाठीची निविदा प्रक्रिया मेअखेपर्यंत पूर्ण केली जाईल.
गुजरातमध्ये ‘गिफ्ट’ या आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्राचे काम जोमाने सुरू असून मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने येथे आयएफएससी उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या, वित्तीय संस्था, देशातील महत्त्वाच्या बँका मुंबईत वित्तीय सेवा केंद्रासाठी अनुकूल आहेत. त्यांचा रस मुंबईतच आहे. या पाश्र्वभूमीवर सुमारे २०० हेक्टर बांधकाम क्षेत्रावर अत्याधुनिक पद्धतीने आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृतिगट नेमला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत त्याची बैठक मंत्रालयात झाली. त्या वेळी नॅसडॅकचे माजी अध्यक्ष मॅग्नस बॉकर, आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक पी.एस. जयकुमार, सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन आदी उपस्थित होते, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांनी दिली.
आराखडा तयार करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी कमी असून तो सहा महिन्यांचा असावा, अशी विनंती रस दाखविलेल्या कंपन्यांनी दर्शविली असून ती राज्य सरकारकडून मान्य होण्याची शक्यता आहे. सिंगापूर, लंडन व अन्य ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रांचा अभ्यास करून त्यातील कोणत्या बाबी मुंबईतील केंद्रात सुरू करता येतील यासाठी चंदा कोचर यांचा अभ्यासगट काम करणार आहे. सुमारे २०० हेक्टरपैकी पहिल्या टप्प्यात ३० हेक्टर जमिनीवर चार चटईक्षेत्र निर्देशांकानुसार १२० हेक्टर बांधकाम क्षेत्र विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. या केंद्रामुळे विविध क्षेत्रांमध्ये हजारो नोकऱ्या तयार होतील, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

‘अमिताभ यांना हटवा’
‘पनामा’ मधील बेहिशेबी गुंतवणूक प्रकरणात अमिताभ बच्चन यांच्या नावाचा समावेश असल्याने, केंद्र सरकारकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था उभारण्याकरिता नेमण्यात आलेल्या सल्लागार पदावरून तसेच राज्याच्या व्याघ्रदूतपदावरून बच्चन यांना हटविण्यात यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केली.
वित्तीय सेवा केंद्राची उभारणी करताना या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाची नाटय़गृहे व कलादालने असावीत. देशविदेशातील कलावंत तेथे आपली कला सादर करू शकतील.
– अमिताभ बच्चन यांनी बैठकीत केलेली सूचना