05 March 2021

News Flash

‘हेल्पेज इंडिया’ला आंतरराष्ट्रीय सन्मान

भारतातील संस्थेला प्रथमच ‘यूएन पॉप्युलेशन अ‍ॅवॉर्ड’

(संग्रहित छायाचित्र)

‘हेल्पेज इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेने ‘यूएन पॉप्युलेशन अ‍ॅवॉर्ड’ हा आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त केला आहे. संयुक्त राष्ट्रांतर्फे  दिला जाणारा हा सन्मान प्रथमच एका भारतीय संस्थेला मिळाला आहे. सन्मानपत्र, सुवर्णपदक आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

देशातील २५ राज्यांतील १२५ जिल्ह्य़ांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘हेल्पेज इंडिया’ काम करते. ‘ज्येष्ठ नागरिकांची शुश्रूषा हा विषयाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्राप्त झाल्याचा आनंद होत आहे.

भारतात मोठय़ा प्रमाणावर ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्टय़ा कुटुंबावर अवलंबून आहेत. बऱ्याचदा कुटुंबाला त्यांचे ओझे होते व त्यांना अपमानास्पद वागणूक सहन करावी लागते. यामुळे ज्येष्ठांसमोर आर्थिक, शारीरिक आणि मानसिक प्रश्न उभे राहतात,’ अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष किरण कर्णिक यांनी दिली.

हेल्पेज इंडियाच्या फिरत्या आरोग्य केंद्राद्वारे ३० लाख ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्यपचार दिले जातात. त्यांना स्वावलंबी आयुष्य जगता यावे यासाठी तंत्रसाक्षरता उपक्रमही राबवला जातो. लहान मुलांमध्ये ज्येष्ठ नागरिकांविषयी आदराची भावना निर्माण व्हावी यासाठी शाळांमध्ये जाऊन जनजागृती केली जाते.

इंदिरा गांधी, जेआरडी टाटा मानकरी

यूएन पॉप्युलेशन अ‍ॅवॉर्ड वैयक्तिक आणि संस्था अशा दोन गटांमध्ये दिला जातो. वैयक्तिक गटात १९८३ साली इंदिरा गांधी यांना तर, १९९३ साली जेआरडी टाटा यांना सन्मानित करण्यात आले होते.

संस्थेचे कार्य

प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी गेली चार दशके  ही संस्था कार्यरत आहे. ज्येष्ठ नागरिकांचे निवृत्तिवेतन, त्यांच्यावरील अन्याय, आरोग्य, इत्यादी प्रश्नांसंदर्भात देश, राज्य आणि स्थानिक पातळीवर आवाज उठवला जातो. ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची कुटुंबे, निराधार, स्थलांतरित यांच्यासाठी काम करत असताना ही संस्था १० लाख लोकांपर्यंत पोहोचली आहे. टाळेबंदीच्या काळातही विविध वृद्धाश्रमांतील आणि घरात एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी या संस्थेने काही उपक्रम राबवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 12:15 am

Web Title: international honor to helpage india abn 97
Next Stories
1 करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना नोकरी नाकारली
2 पुरुषांनीही मातृत्वभावना जपावी!
3 ग्रामपंचायत निवडणूक जाहीर
Just Now!
X