संदीप आचार्य

करोनासह विविध साथरोग, रुग्णांमधील प्रतिकारशक्ती, जनुकीय बदल, प्रतिपिंडासह उपचाराची दिशा या विषयांवर संशोधन करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘साथरोग आजार व प्रतिकारशक्ती शास्त्र संस्था’ स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावित संशोधन संस्थेला तत्त्वत: मान्यता दिली आहे.

आजार, नागरिकांची प्रतिकारशक्ती, जलजन्य आजार, रक्तद्रव उपचार, प्रतिपिंड, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय साथरोग, करोना तसेच आगामी काळातील आजारांचा सामना करण्यासाठी करावयाची तयारी आदींचा अभ्यास व संशोधन करण्यासाठी ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’चे (आयसीएमआर) सहसंचालक डॉ. ओम श्रीवास्तव यांनी राज्य शासनाला रुग्णालयाशी संलग्न असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची संशोधन संस्था स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला.

कस्तुरबा रुग्णालयातील या संशोधन संस्थेत प्रतिपिंडाचा अभ्यास, ‘टी सेल’ ज्यात शरीरातील विषाणू निष्क्रिय करण्याची क्षमता असलेली प्रतिपिंड, थुंकी, घसा तसेच लाळेतून घेतलेला द्रव, करोना व अन्य साथरोग आजारांवरील औषधे, विषाणू संसर्गावरील उपाययोजना, प्रतिकारशक्ती शास्त्र, संसर्गजन्य आजार तसेच साथरोग आजारांवर  संशोधन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्या दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. वैद्यकक्षेत्रातील महत्त्वाच्या संशोधनावरही ही संस्था लक्ष ठेवून राहाणार आहे.

हे संशोधन एका व्यापक पायावर उभे राहाणार असून यात सार्वजनिक आरोग्य, रुग्णालये, विद्यापीठे, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, पशुवैद्यकीय विद्यापीठ, वैद्यकीय संशोधन संस्था, एपिडेमॉलॉजीसह वेगवेगळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञांना सामावून घेण्याचे डॉ. श्रीवास्तव यांच्या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

‘इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन इन्फेक्शस डिसिज, इम्युनॉलॉजी अ‍ॅण्ड आऊटब्रेक मॅनेजमेंट’ असे या प्रस्तावित संस्थेचे नाव असून, डॉ. ओम श्रीवास्तव हे प्रमुख असतील. तर डॉ. जयंती शास्त्री, डॉ. स्वप्निल पारिख, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, टाटा ट्रस्ट व राज्य सरकारचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे.

खर्च किती?

पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात यासाठी दोन हजार चौरस फुटांची जागा पहिल्या टप्प्यासाठी निश्चित करण्यात आली असून बांधकामासाठी ७५ लाख, दोन प्रयोगशाळांसाठी सहा कोटी, आवश्यक उपकरणांसाठी २५ लाख, आपत्कालीन खर्च एक कोटी तसेच संशोधक व अन्य कर्मचारी यांच्यासाठी चार कोटी ७४ लाख ६० हजार असा १२ कोटी ७४ लाख ६० हजार रुपयांचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तीन वर्षांत ही संशोधन संस्था पूर्णत्वास येणार असून, यात दुसऱ्या टप्प्यातील नऊ कोटी रुपयांचा समावेश आहे.