तुलनेने स्वस्त विमान तिकीटदर पर्यटकांच्या पथ्यावर; आंतरराष्ट्रीय पर्यटनात १८ टक्क्यांनी वाढ

युरोपियन देशांसह काही महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांच्या तिकीटदरात झालेली घट, बॉलीवूड चित्रपटांमधून पडणारा प्रभाव आणि नुसतेच भटकण्यापेक्षा नवनवीन देश शोधून तिथली जीवनशैली, संस्कृती जाणून घेण्याची उत्सुकता यापोटी नव्या वर्षांचे स्वागत देशातच करण्यापेक्षा सातासमुद्रापार जाण्याकडे पर्यटकांचा कल वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत चीन, तुर्की हे देश पर्यटकांच्या यादीत होते. यावर्षी युरोपियन देशांबरोबरच साहसी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आफ्रिकेचे नाव पर्यटकांच्या यादीत सामील झाले आहे. नाताळचा आठवडा आणि नवीन वर्षांचा पहिला आठवडा या कालावधीत आंतरराष्ट्रीय पर्यटनात १८ टक्क्याने वाढ झाली आहे, तर देशांतर्गत पर्यटनात १५ टक्क्याने वाढ झाली आहे.

देशांतर्गत पर्यटनापेक्षा आंतरराष्ट्रीय पर्यटनात गेली काही वर्षे सातत्याने वाढ होत आहे. वर्षअखेरीची नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षांचा पहिला आठवडा असा मोठा सुट्टीचा कालावधी असल्याने या काळात देशाबाहेर जाणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण मोठे असते. त्यातही हिंदी चित्रपटांनी लंडनपासून ऑस्ट्रिया, हंगेरीपर्यंत अनेक युरोपियन देशांची सफर प्रेक्षकांना घडवली असल्याने युरोपला भारतीय पर्यटकांकडून सर्वात जास्त पसंती आहे. यावर्षी मुंबई-लंडन विमानप्रवास भाडे आधीपेक्षा १.३ टक्क्याने कमी झाले आहे, तर लंडन, वॉशिंग्टन, न्यूयॉर्कसाठीचे प्रवासभाडे जवळपास २७ टक्क्याने खाली उतरले आहे. देशी विमान कंपन्यांनी विमानांची संख्या वाढवत परदेशातही आपला व्यवसाय विस्तारित केला असल्याने तिकीटदरांमध्ये बऱ्यापैकी सूट मिळू लागली आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय पर्यटनवाढीला प्रोत्साहन मिळाले असल्याचे मत जॉन नायर, कॉक्स अँड किंग्जचे व्यवसायप्रमुख यांनी नोंदवले.

नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी सातत्याने देशाबाहेर जाणाऱ्या पर्यटकांचा कल फ्रान्स, जर्मन, स्वित्र्झलड या देशांकडे आहे, तर अगदी कमी वेळात गाठता येणारे देश म्हणून सिंगापूर, दुबई, मलेशिया, अबुधाबी, हाँगकाँग, थायलंड हे आजही पर्यटकांच्या यादीतील अग्रणी देश आहेत, अशी माहिती इझीगो१ च्या संचालिका नीलू सिंग यांनी दिली. मात्र सध्या साहसी पर्यटनाकडे लोकांचा कल वाढला असून त्यासाठी आफ्रिकेला पसंती मिळू लागली आहे. आफ्रिकन सफारीसह इजिप्त, जॉर्डन, इस्रायल, जपान, उझबेकिस्तान या देशांकडे पर्यटकांचा ओघ वाढतो आहे, अशी माहिती कॉक्स अँड किंग्जचे करण आनंद यांनी दिली. देशांतर्गत पर्यटनस्थळांमध्ये खास नव्या वर्षांच्या स्वागतासाठी म्हणून आजही गोव्यालाच जास्त पसंती आहे. वर्षांअखेरीच्या आठवडय़ात मुंबई-गोवा विमानप्रवास दरात २१ टक्क्याने वाढ असूनही पर्यटकांची सर्वाधिक गर्दी गोव्यात असणार आहे. त्यापाठोपाठ कोचीलाही पर्यटकांची पसंती मिळते आहे. देशांतर्गत पर्यटनस्थळांमध्ये खास नववर्षांच्या स्वागतासाठी म्हणून गोवा, पाँडिचेरी, सिक्कीम, नागालँड, राजस्थान आणि कच्छचा या काळात भरणारा रणउत्सव अशा मोजक्याच ठिकाणी पर्यटकांची गर्दी असल्याची माहिती नीलू सिंग यांनी दिली.

क्रूझ सफारीकडे ओढा

आलिशान आणि सर्वसुखसोयींनी युक्त असलेल्या क्रूझ सफारीचे वेड सध्या पाहायला मिळत असून पूर्वेकडील देशांमध्ये नेणाऱ्या सुपर स्टार जेमिनी क्रूझ, सुपर स्टार लिब्रा क्रूझ अशा महागडय़ा क्रूझ सफारींना मोठी मागणी असल्याची माहिती करण आनंद यांनी दिली. याशिवाय, अंटाक्र्टिका-अलास्का अशा लांबच्या ठिकाणी नेणाऱ्या क्रूझसाठीही पर्यटक उत्सुक असून नवीन वर्षांत क्रूझ सफारी हा पर्यटन क्षेत्रातील मोठा ट्रेंड ठरणार असल्याचे सूतोवाच पर्यटन व्यावसायिकांनी केले आहे.