हर्षद कशाळकर

अलिबाग- रायगड जिल्ह्यातील बहुतांश प्रशासकीय विभागांच्या प्रमुख पदावर सध्या महिला कार्यरत आहेत. आपआपल्या पदांच्या जबाबदाऱ्या त्या तितक्याच नेटाने पार पाडत आहे. पुरूषांप्रमाणेच महिलाही प्रशासकीय पातळीवर तितक्याच कार्यक्षमतेने काम करू शकतात हे या निमित्ताने रायगडकरांना अनुभवायला मिळत आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांच्याकडे आहे. राज्यमंत्री म्हणून सात महत्वाच्या खात्यांचा कार्यभार त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे. यात उद्योग, पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार, महिती व जनसंपर्क आणि विधी व न्याय विभागाचा समावेश आहे. वयाच्या ३२ व्या वर्षी त्यांना ही संधी प्राप्त झाली. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळणाऱ्या त्या पहिल्या महिला मंत्री आहेत.

जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय पद मानले जाते. या पदावर सध्या निधी चौधरी यांच्या रुपाने महिला अधिकारी कार्यरत आहे. राजस्थानमधील नागौर जिल्ह्याच्या रहिवाशी असणाऱ्या निधी चौधरी यांनी आपले उच्च शिक्षण जयपूर येथे पूर्ण केले आहे. लोक प्रशासन या विषयात त्यांनी पीएच.डी प्राप्त केली आहे. प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्या काही काळ रिझर्व्ह बँकेतही कार्यरत होत्या. २०१२ साली त्या भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. महाराष्ट्रात त्यांना नियुक्ती देण्यात आली. प्रशासकीय सेवेत आल्यापासून त्यांनी रायगडसह, पालघर, मुंबई येथे विविध विभागांचे काम पाहिले.

रायगडच्या जिल्हा व सत्र न्यायाधिश म्हणून विभा इंगळे कार्यरत आहेत. या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला न्यायाधिश आहेत. १९४९ मध्ये अलिबाग येथे स्वतंत्र जिल्हा व सत्र न्यायलयाची स्थापना करण्यात आली. गेल्या सत्तर वर्षात या पदावर महिला न्यायाधिशांची नियुक्ती झाली नव्हती. रायगड जिल्ह्यातील सर्व न्यायालयांच्या प्रशासकीय प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. जिल्हा व सत्र न्यायालयातील अनेक महत्वाच्या प्रकरणांची सुनावणी त्यांच्यासमोर सुरु आहेत.

जिल्हाच्या निवासी जिल्हाधिकारी म्हणून डॉ. पद्मश्री बैनाडे, जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून वैषाली माने, अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवार, पेणच्या प्रांताधिकारी म्हणून प्रतिमा पुदलवाड, माणगावच्या प्रांताधिकारी म्हणून प्रशाली दिघावकर कार्यरत आहेत. या शिवाय महसूल आणि पोलीस विभागात अनेक महिला अधिकारी कार्यरत आहेत. जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन विभागातील पनवेल आणि पेण कार्यालयांची जबाबदारी दोन महिला अधिकारी संभाळत आहेत. एसटीच्या विभागीय नियंत्रक पदावर अनघा बरटक्के कार्यरत आहेत. अलिबाग, पेण, कर्जत, मुरुड, माणगाव, महाड, रोहा आणि श्रीवर्धन या सात आगारांची प्रशासकीय प्रमुख म्हणून त्या आपली जबाबदारी पार पाडत आहेत.

अधिकारी म्हणून जेव्हा एखाद्या पदावर महिला कार्यरत असते. तेव्हा त्या पदाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात. महिला म्हणून त्यात सुट मिळत नाही. अथवा कौटूंबिक जबाबदाऱ्या असल्याचे कारणही पुढे करता येत नाही. उलट महिला या मुळातच संवेदनशील असल्याने त्या जास्त चांगेल काम करू शकतात हे या अधिकारी महिला आपल्या कामातून दाखवून देत आहेत.