वरिष्ठ सल्लागारांची ३२, कनिष्ठ सल्लागारांची ३६ पदे
मुंबई : मुंबई महापालिकेच्या सहा उपनगरीय रुग्णालयांमध्ये अधिक प्रभावीपणे वैद्यकीय सेवा देता यावी यासाठी प्रशासनाने ६८ डॉक्टरांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्याचा निर्णय घेतला असून येत्या शुक्रवार आणि शनिवारी इच्छुक डॉक्टरांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. मुंबई सेंट्रल येथील पालिकेच्या नायर रुग्णालयात सकाळी ९ ते दुपारी १ या दरम्यान या मुलाखती होणार आहेत. उपनगरीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना चांगले उपचार मिळावे यासाठी ६८ तज्ज्ञ डॉक्टरांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात येणार आहे. यापैकी ३२ डॉक्टर वरिष्ठ सल्लागार स्तरावरील, तर ३६ डॉक्टर कनिष्ठ सल्लागार स्तरावरील असतील. यामध्ये भेषज्य (Medicine), शल्यचिकित्सा (Surgery), स्त्रीरोगतज्ज्ञ (Obst. & Gyn.) बालरोगतज्ज्ञ (Pediatrics), अस्थिरोगतज्ज्ञ ((Orthopedics)), भूलतज्ज्ञ , Anaesthesia विकिरणतज्ज्ञ (Radiology), कान-नाक-घसा तज्ज्ञ ((E.N.T), नेत्रतज्ज्ञ ((Ophthalmology), रोगनिदान तज्ज्ञ ((Pathology)) इत्यादी वैद्यकीय विद्या शाखांशी संबंधित विविध ६८ डॉक्टरांचा समावेश आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे. यासाठी नायर रुग्णालयात शुक्रवार आणि शनिवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत इच्छुक डॉक्टरांची मुलाखती घेण्यात येणार आहेत.
कनिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज करणारा अर्जदाराकडे एम. डी. किंवा एम. एस. किंवा डी. एन. बी. अशी शैक्षणिक पात्रता आणि किमान पाच वर्षे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. वरिष्ठ सल्लागार पदासाठीची शैक्षणिक पात्रता एम. डी. किंवा एम. एस. किंवा डी. एन. बी. अशी असून आठ वर्षांचा कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. तसेच वरिष्ठ सल्लागार पदासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीने किमान तीन संशोधनविषयक कामे केलेली असावीत, तर कनिष्ठ सल्लागार पदासाठी किमान दोन संशोधनविषयक कामे आवश्यक आहेत. तसेच अर्जदाराला मराठी भाषा येणे आवश्यक आहे. निवड होणाऱ्या वरिष्ठ सल्लागारांना दरमहा दोन लाख रुपये, तर कनिष्ठ सल्लागारांना दरमहा एक लाख ५० हजार रुपये इतके ढोबळ मानधन असेल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 8, 2021 12:02 am