गोंदिया जिल्ह्य़ात मुदत संपलेल्या सिमेंटची विक्री केली जात असून, त्यामुळे इमारतींच्या बांधकामांचा दर्जा खालावण्याची शक्यता आहे. यामागे एखादी संघटित टोळी कार्यरत असण्याची शक्यता असून, त्याची विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून चौकशी करावी, असे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिले.

हा प्रश्न के वळ गोंदियापुरता मर्यादित नसून, राज्यात अशाच प्रकारे मुदत संपलेले सिमेंट विकले जाते का, याचा तपास करणे आवश्यक आहे, असे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

गोंदिया जिल्ह्य़ात ‘एसीसी’ कंपनीच्या मुख्य वितरकाकडून किरकोळ विक्रेत्यांना मुदत संपलेल्या सिमेंटच्या गोण्या नोव्हेंबर, २०१९ मध्ये वितरित करण्यात आल्या होत्या. यासंदर्भात कंपनी व्यवस्थापनाकडे तसेच गोंदिया पोलिसांकडे वारंवार तक्रारी दाखल करण्यात आल्या. पोलीस तपासात प्रथमदर्शनी मुदत संपल्याचा माल पुरवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात गुरुवारी विधान भवनात विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या संदर्भात विशेष चौकशी पथकाद्वारे सखोल तपास करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश या वेळी त्यांनी दिले.