संदीप आचार्य

नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांच्या झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व रुग्णालयांमधील प्राणवायू साठवणूक टाक्या तसेच व्यवस्थेचे तात्काळ लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी राज्य करोना कृती दलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांची ऑक्सिजन पुरवठादारांकडून होत असलेली छळवणूक आणि त्यातून निर्माण झालेले ऑक्सिजनमाफिया रोखण्यात यावे, असेही कृती दलाचे डॉक्टर तसेच काही खासगी रुग्णालयांनी आर्जव केले आहे.

नाशिक येथील झाकीर हुसेन रुग्णालयात दीड महिन्यांपूर्वी भाडेतत्त्वावर ऑक्सिजन साठवणूक टाकी बसविण्यात आली होती. या टाकीतून होणाऱ्या पुरवठ्यात गळती होऊन ऑक्सिजन पुरवठा थांबल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसते. याबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी हा विषय केवळ याच रुग्णालयाचा नसून करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ज्या रुग्णालयांमध्ये अशाप्रकारे ऑक्सिजन साठवणूक टाक्या आहेत, त्या सर्वच रुग्णालयांचा असल्याचे राज्य कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी सांगितले.

रुग्णसंख्या वाढत असल्याने करोना रुग्णालयात रूपांतर केलेल्या बहुतेक रुग्णालयांनी ऑक्सिजन साठवणूक टाक्या बसवायला सुरुवात केली आहे. अनेक रुग्णालयांनी आपली क्षमता दुप्पट केली. या ऑक्सिजन टाक्यांतून अथवा रुग्णालयात या टाक्यांच्या माध्यमातून ऑक्सिजन वाहून नेताना गळती झाल्यास ती तात्काळ रोखणे तसेच तोपर्यंत रुग्णांच्या ऑक्सिजनची पर्यायी व्यवस्था केली आहे अथवा नाही, याची कोणतीच ठोस माहिती आज राज्याची आरोग्य यंत्रणा तसेच महापालिकांकडे नसल्याचे नाशिक दुर्घटनेतून अधोरेखित होत असल्याचे शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितले, तर नाशिक दुर्घटनेमुळे राज्यातील सर्वच रुग्णालयांतील ऑक्सिजन साठवणूक व्यवस्थेचे लेखापरीक्षण झाले पाहिजे, अशी भूमिका डॉ. संजय ओक यांनी मांडली.

ऑक्सिजनमाफियांचा त्रास

काही खासगी रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनमाफियांचा सामना करावा लागत आहे. खासगी रुग्णालयांना पुरवठादारांकडून सध्या दुप्पट दराने ऑक्सिजन पुरवठा केला जातो. हा पुरवठाही सर्वस्वी पुरवठादारांच्या मेहेरबानीवर अवलंबून असतो. एकीकडे शासकीय यंत्रणेलाच ऑक्सिजन मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असताना आमच्या तक्रारीची दखल कोण घेणार, असा सवाल या डॉक्टरांनी केला. मोठे ऑक्सिजन सिलिंडर जे कालपर्यंत सहा हजार रुपयांना मिळायचे, त्यासाठी आज १० हजार रुपये मोजावे लागतात तर मायक्रो सिलिंडर जो १० हजार रुपयांना मिळायचा त्याला २० हजार रुपये द्यावे लागतात, असे खासगी रुग्णालयांकडून सांगण्यात आले. मात्र यातील एकाही रुग्णालयांचे प्रतिनिधी उघडपणे बोलण्यास तयार नाहीत कारण उघडपणे बोलल्यास ऑक्सिजनमाफिया त्रास देतील ही भीती त्यांना आहे. राज्य कृती दलाच्या डॉक्टरांनी हा विषय त्यांच्या व्यासपीठावर घेतला असून लवकरच कृती दलाच्या माध्यमातून शासनाकडे याबाबत कारवाईसाठी शिफारस केली जाईल, असे कृती दलाच्या एका सदस्याने सांगितले.