रेमडेसिविरचा काळाबाजार व  साठेबाजी करणाऱ्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए ) व  सक्तवसुली संचालनालय (ईडी ) यांच्यामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी  राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या वतीने दिल्लीत  सोमवारी दूरसंवादप्रणालीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत, त्यांनी रेमडेसिविरचा काळाबाजार आणि साठेबाजी करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण करण्यासाठी  केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. रेमडेसिविर हे करोनावरील रामबाण औषध नाही. परंतु विशिष्ट कालावधीत हे औषध दिल्यास काही प्रमाणात रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकारने हे औषध कुठे आणि किती प्रमाणात उपलब्ध आहे, याची माहिती देऊन त्याचे गरजेनुसार सर्व राज्यांना पुरेशा प्रमाणात वितरण करावे, अशी मागणी चव्हाण यांनी के ली.

भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करा -जगताप

रेमडेसिविर औषधाचा साठा के ल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल  विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस व  प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.