उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीचे कथित मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यावरून विधानसभेत शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधी भाजप सदस्यांमध्ये खडाजंगी झाली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेली  एनआयए तपासाची मागणी फेटाळून हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात येत असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी केली.

या प्रकरणातील घटनाक्रम संशयास्पद आहे. तसेच त्या चोरीच्या गाडीचे मालक व या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेले मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढल्याने याची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र, एनआयए तपासाची मागणी फेटाळून लावत हे प्रकरण दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात येत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर केले.  मनसुख त्या गाडीचे मालक नव्हते तर सॅम न्यूटन हे या गाडीचे मूळ मालक आहेत. त्यांनी मनसुख यांच्याकडे गाडीची अंतर्गत सजावट करण्याचे काम दिले होते. ते पैसे थकल्याने मनसुख यांनी गाडी आपल्याकडे ठेवून घेतली होती, असे उजेडात आले आहे. मनसुख यांच्या मृतदेहाचे विच्छेदन होणार असून त्याचा अहवाल आल्यावर मृत्यू कसा झाला हे उघड होईल. महाराष्ट्र पोलीस तपास करण्यास सक्षम आहेत, असे सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘एनआयए’कडे तपास सोपवण्याची मागणी फेटाळली. तसेच या प्रकरणाचा तपास वाझे नव्हे तर दुसऱ्या अधिकाऱ्याकडे आहे. अर्णब गोस्वामींना तुरुंगात टाकले म्हणून तुमचा वाझेंवर राग आहे का, असा सवालही देशमुख यांनी भाजपच्या आमदारांना केला.

विधानसभा नियम २९३ अन्वये विरोधकांनी उपस्थित केलेल्या कायदा आणि सुव्यवस्था, कोविडकाळात झालेला भ्रष्टाचार, विविध घटक, समाजांचे प्रश्न आदी विषयांवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत होते.