चर्चगेट रेल्वे स्थानकात झालेल्या लोकल अपघाताची चौकशी सुरू असताना संबंधित मोटरमनला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शक्यता रेल्वेच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. अपघाताच्या दिवशी मोटरमनच्या केबीनमध्ये शिरून पुराव्यात छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला होता, अशी माहिती एका रेल्वे कर्मचाऱ्याने दिली आहे. गेल्या रविवारी चर्चगेट स्थानकात झालेल्या लोकल अपघाताची चौकशी सुरू आहे. मात्र या अपघातानंतर रेल्वेच्या एका कर्मचाऱ्याने लोकलमध्ये प्रवेश करून ब्रेकला हात लावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती रेल्वेच्याच एका कर्मचाऱ्याने दिली. अपघातानंतर जखमींना मदतीशिवाय कुठल्याही वस्तूला स्पर्श न करण्याचा नियम आहे; तरीही केबिनमध्ये शिरून ब्रेक दाबण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे मोठा आवाज झाला होता, अशीही माहिती या कर्मचाऱ्याने दिल्याचे सुत्रांनी सांगितली. हा प्रकार म्हणजे पुराव्यात छेडछाड करून त्या मोटरमनला वाचविण्याचा प्रयत्न असावा, असे सांगण्यात आले. चौकशी अहवाल आल्यानंतरच यावर बोलता येईल, असे प्रभारी महाव्यवस्थापक सुनिलकुमार सूद यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 7, 2015 2:37 am