प्रसाद रावकर

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेदरम्यान बंद आढळलेल्या घरांमधील रहिवाशी परतल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी आणि गरजेनुसार करोना चाचणी करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. अन्य भागांतून येणाऱ्या या रहिवाशांमुळे मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ही काळजी घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महापालिकेने मुंबईमध्ये १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत दोन टप्प्यांमध्ये ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविली. त्यासाठी पालिकेच्या आरोग्य खात्यातील कर्मचारी, आरोग्य स्वयंसेविका आणि स्वयंसेवकांची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी झोपडपट्टय़ा, दाटीवाटीने उभ्या असलेल्या वस्त्या, निवासी संकुलांमधील घराघरात जाऊन तपासणी केली. त्याचबरोबर करोनापासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या याबाबत मार्गदर्शनही केले.

मुंबईमधील ३५ लाख २० हजारांपैकी सुमारे ३४ लाख ९० हजार घरांमध्ये पोहोचून या पथकांनी नागरिकांची तपासणी केली. मात्र काही घरे बंद असल्याचे पथकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पथकांनी नंतर दोन-तीन वेळा बंद घरे उघडली आहेत का, याची पाहणी केली. करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर मुंबईतील परप्रांतीयांनी गावची वाट धरली होती. तसेच महाराष्ट्राच्या अन्य गावांतून नोकरी, व्यवसायानिमित्त आलेल्यांनीही मुंबईतून काढता पाय घेतला होता. त्यामुळे घरे बंद होती. कालांतराने काही जण परतले. त्यांची पथकांनी तपासणी केली. मात्र ३० हजारांहून अधिक घरे अद्याप बंदच आहे. यामध्ये झोपडपट्टय़ांमधील १२ हजार घरांचा समावेश आहे.

या घरांची यादी तयार करण्यात आली असून ती संबंधित विभाग कार्यालयांकडे सोपविण्यात आली आहेत. या घरांची पुन्हा पाहणी करून रहिवाशी परतले असल्यास त्यांची तपासणी व गरजेनुसार करोनाविषयक चाचणी करण्याचे आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. परराज्यांतून अथवा महाराष्ट्राच्या अन्य भागांतून येणाऱ्या रहिवाशांमुळे मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ही काळजी घेण्यात येत असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

सतर्कता.. : करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेत झोपडपट्टय़ा अथवा दाटीवाटीच्या वस्तीमधील स्थानिक डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णामध्ये करोनाची लक्षणे आढळल्यास त्याला तात्काळ करोना चाचणीसाठी पाठवावे किंवा पालिकेशी संपर्क साधून त्याबाबत माहिती द्यावी अशी सूचना डॉक्टरांना करण्यात आली आहे. त्याचबरोबर झोपडपट्टय़ांमध्ये मोबाइल व्हॅनद्वारे चाचण्यांची सेवा उपलब्ध करण्याचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.

करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत आढळलेल्या बंद घरांमधील रहिवाशी परतले असल्यास त्यांची तपासणी, चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. आसपासच्या बंद घरातील रहिवाशी परतले असतील तर शेजाऱ्यांनी त्याची माहिती पालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयांतील वॉर रुमला द्यावी. उपचारासाठी आलेल्या रुग्णामध्ये करोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ पालिकेला कळविण्याची सूचना स्थानिक डॉक्टरांना करण्यात आली आहे.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त