विधिज्ञ वृंदा ग्रोवर यांची टीका  

मुंबई : जातीयता किंवा धार्मिकतेच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचारांच्या घटनांचा तपास सदोष पद्धतीनेच केला जात असल्याने गुन्हेगार मोकाट सुटतात, अशी जळजळीत टीका विधिज्ञ वृंदा ग्रोवर यांनी शुक्रवारी केली.

‘द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई’ येथे बन्सरी शेठ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ संजय सिंघवी उपस्थित होते.

जातीयवादाच्या खटल्यांचे दाखले देत तपास यंत्रणेतल्या त्रुटी ग्रोवर यांनी यावेळी प्रामुख्याने अधोरेखित केल्या. ‘हाशिमपुरा येथे १९८७ साली ४० मुस्लिमांना मारल्याची घटना असो किंवा अलीकडेच झालेली काश्मीरमधील आसिफा बानोची हत्या असो. जातीयवादातून घडणाऱ्या अशा गुन्ह्य़ांचे खटले न्यायालयात उभे राहतात, त्यावेळेस घटनांच्या सदोष तपासांमुळे गुन्ह्यांचे अनेक पुरावे निसटून गेल्याचे पुढे येते. वैद्यकीय तपास, गुन्हा दाखल करताना करायच्या बारीक नोंदी, घटनेची छायाचित्रे, नोंदविलेले जाबजबाब इत्यादी अनेक पातळ्यांवर तपास यंत्रणा कमकुवत असल्याचे दिसून येते. परिणामी खटले वर्षांनुवर्षे चालत राहतात. शिवाय बहुतांशी खटल्यांमध्ये अपुऱ्या पुराव्यांमुळे गुन्हेगारांची निर्दोष सुटका होते. त्यामुळेच अशा खटल्यांच्या तपासांमध्ये त्रुटी आढळल्यास पोलिसांसह त्यात सहभागी असलेल्या प्रत्येक घटक यंत्रणेलाही जबाबदार धरणारे बदल व्हायला हवेत. ती अशा खटल्यांची गरज आहे, असेही ग्रोवर यांनी सांगितले.  जातीयवादातून घडलेल्या घटनेच्या नोंदी ठेवण्याच्या कायदेशीर प्रक्रियेचे प्रशिक्षण पोलिसांना देणे गरजेचे आहे. कोणताही पूर्वग्रह किंवा भेदभाव न ठेवता अशा खटल्यांचा तपास होणे आवश्यक आहे. आपल्याकडेच घडलेल्या आधीच्या घटनांच्या तपासामधील चुकांची पुनरावृत्ती टाळून अभ्यासपूर्ण पद्धतीने तपास कसा करता येऊ शकतो याचा विचार तपास यंत्रणांनी केल्यास बराचसा बदल घडू शकेल. त्याचबरोबर न्यायव्यवस्थेमध्येदेखील अशा खटल्यांना प्राधान्य देणे तितकेच गरजेचे असल्याचे ठाम मतही ग्रोवर यांनी मांडले. अशा खटल्यांच्या तपासाबाबत नकारात्मक चित्र असले तरी यातील काही खटल्यांना सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे न्याय मिळाला आहे. त्यामुळे तपास यंत्रणांमधील सुधारणांसोबतच नागरिकांनीही यासाठी प्रयत्नपूर्ण झगडा करणे महत्त्वाचे असल्याचे ग्रोवर यांनी स्पष्ट केले.