विज्ञान क्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष होत असून यामध्ये अधिक गुंतवणूक होणे गरजेचे असल्याच्या डॉ. सी. एन. आर. राव यांच्या मताशी संशोधक सहमत असल्याचे चित्र आहे. विज्ञान क्षेत्रात पुरेशा प्रमाणात गुंतवणूक होत नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तसेच विज्ञान संशोधन हे आपले ध्येय व्हावे, असे मतही त्यांनी नमूद केले आहे. इतकेच नव्हे तर विज्ञान शिक्षणाकडेही काणाडोळा होत असल्याचे मत शिक्षण महर्षीनी नोंदविले आहे.
विज्ञान संशोधनासाठी इतर देशांच्या तुलनेत आपण कमी गुंतवूणक करत आहोत असे चित्र सध्या पाहवयास मिळत आहे. सरकारतर्फे नवनवीन विज्ञान संस्थांची उभारणी होत असली तरी लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रयत्न कमी पडत असल्याचे मत होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेचे माजी संचालक डॉ. हेमचंद्र प्रधान यांनी व्यक्त केले. विज्ञानात प्रगती साधायची असेल तर सर्वप्रथम आपण शाळा आणि महाविद्यालय स्तरावर विज्ञान शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे. तसेच शिक्षकांचाही दर्जा सुधारणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. आपल्याकडे आजही प्रयोगशाळांकडे दुर्लक्ष होते. तसेच विज्ञान शिक्षकांची संख्या वाढवण्याकडेही सरकारने लक्ष देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. असेही त्यांनी नमूद केले.  ठोकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या पाच ते सहा टक्के गुंतवणूक विज्ञान संशोधनावर होणे गरजेचे असून आपण त्या दृष्टीने वाटचाल करायला हवी, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरविंद कुमार यांनी व्यक्त केले. देशात सध्या विज्ञान क्षेत्रात गुंतवणूक सुरू आहे. मात्र तिचा वेग वाढणे गरजेचे आहे. जे देश काही वर्षांपूर्वी विज्ञान संशोधनात आपल्या मागे होते ते आता पुढे जाऊ लागले आहेत. यामुळे आपण विज्ञान संशोधनाच्या बाबतीत ध्येयवादी व्हावे, असेही ते म्हणाले.
संशोधनासाठी चांगल्या दर्जाचे साहित्य वापरण्यासाठी पैसे लागतात. अनेकदा ते कमी पडतात, असे मत ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सेस’ चे माजी संचालक एस. ए. सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. अनेक विद्यार्थ्यांना आजही संशोधनात अनेक वर्ष खर्च करूनही चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही.यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न होणे गरजेचे आहे. संस्थांनीही पुढाकार घेऊन उद्योगांसाठी संशोधन करून पैशांचा प्रश्न सोडविणे गरजेचे असल्याचेही सूर्यवंशी म्हणाले.
निधी उभारण्यासाठी विज्ञान संस्था तसेच विज्ञानप्रेमींनी मदत करणे गरजेचे असून विज्ञानात पैसे गुंतवल्यावर ताबडतोब चांगला परतावा मिळेल अशी आशा न बाळगत चिकाटी ठेवणे आवश्यक असल्याचे मत ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल सायन्सेस’चे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांनी व्यक्त केले. ठोकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या दोन टक्के रक्कम विज्ञान संशोधनासाठी दिली जाईल, असे सांगण्यात येत होते. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम दिली जात नसल्याचेही ते म्हणाले. विज्ञान संशोधन हे एक मिशन म्हणून ओळखले गेले पाहिजे, असेही ते म्हणाले.