सोने, घर, वाहन खरेदीला यंदा पूरक वातावरण

गेल्या सलग दोन वर्षांतील मंदीतून अद्यापही घर तसेच सोने बाजारपेठ सावरली नसल्याने दर तुलनेत स्थिर आहेत. वाहनांच्या किमतीबाबतही तिमाहीनंतर लागू होणाऱ्या वस्तू व सेवा कर मात्रेची प्रतीक्षा तेव्हा यंदाच्या गुढीपाडव्याला अशा स्थिर दरांवर खरेदीची एक पर्वणी असल्याचे मानले जात आहे.

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या सराफा बाजारात मौल्यवान धातूंमध्ये काही प्रमाणात दरांची चमक अनुभवली गेली. सोने तोळ्यासाठी पुन्हा एकदा २९ हजार रुपयांनजीक तर चांदी किलोमागे ४२ हजार रुपयांवर पोहोचली. असे असले तरी हे दर किमान असून गेल्या काही दिवसांतील सराफा बाजारातील मरगळ यंदाच्या सणाच्या निमित्ताने झटकली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सोने खरेदीला नोटाबंदीच्या कालावधीत लगाम घातला गेला होता.

स्थावर मालमत्ता क्षेत्रातील चित्रही यापेक्षा फारसे वेगळे नाही. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हा उद्योग तसा निस्तेजच आहे. स्मार्ट सिटी, पंतप्रधान निवास योजना, १० टक्क्य़ांखालील गृह कर्ज यामुळे या क्षेत्राला काहीशी संजीवनी मिळण्याचा प्रयत्न आहे. त्यातच घरांचे दर गेल्या वर्षांच्या तुलनेत फारसे वाढले नसल्याने या स्तरावर लाभ पदरात पाडून घेण्यासाठी आग्रह धरला जात असल्याचे विकासकांचे म्हणणे आहे. ठप्प पडलेले निवासी प्रकल्प यानिमित्ताने पुन्हा एकदा नव्या विपणन कौशल्यासह सादर होत आहेत.

भारतीय वाहन बाजारपेठेने गेले काही महिने संकटाचा काळ अनुभवला आहे. डिसेंबर २०१६ पर्यंत उत्पादनांचे अनेक पर्याय असूनही मागणीअभावी वाहनांकडे खरेदीदारांनी मोठय़ा प्रमाणात पाठ फिरविली आहे. २०१७ ची सुरुवात या उद्योगासाठी तशी समाधानाची मानली जात असतानाच आता येऊ घातलेल्या वस्तू व सेवा करप्रणालीमुळे दरांबाबत साशंकता आहे.

तेव्हा यंदाचा गुढीपाडवा अन्य खरेदीबरोबरच वाहन क्षेत्रासाठीही लाभदायी ठरण्याची आशा वितरकांकडून व्यक्त होत आहे.

गेल्या दोन वर्षांत उत्पादन शुल्क, निश्चलनीकरण आदी घडामोडी मौल्यवान धातू बाजारपेठेवर विपरीत परिणाम करणाऱ्या ठरल्या आहेत. परिणामी धातूसाठी असलेली मागणीही या कालावधीत रोडावली. यंदाच्या गुढीपाडव्याला मात्र सोने खरेदी २० ते ३० टक्क्य़ांनी वाढण्याची आम्हाला आशा वाटते. त्यासाठी स्थिर दर आणि त्याचबरोबर खरेदीदारांचा, गुंतवणूकदारांचा बदललेला कल या बाबी कारणीभूत आहेत.

आदित्य पेठे, संचालक, डब्ल्यूएचपी ज्वेलर्स