अधिकाधिक कर वाचविला जाऊन गाठीशी अधिक पैसा शिल्लक राहील, यावर साहजिकच सर्वसामान्यांचा भर असतो. करबचतीचा हा मार्ग गुंतवणुकीतून साधता येतो आणि बरोबरीने कुटुंबाच्या भविष्यासाठी तरतूदही केली जाते. अशी गुंतवणूक कशी व कुठे करावी, याचे मार्गदर्शन असलेल्या ‘लोकसत्ता अर्थब्रह्म’ या वार्षिक विशेषांकाच्या प्रस्तुतीसह येत्या मंगळवारी करबचतीच्या सुयोग्य नियोजनासाठी गुंतवणूकदार जागराचा कार्यक्रम योजण्यात आला आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड प्रायोजित आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड सह-प्रायोजक असलेला ‘लोकसत्ता-अर्थब्रह्म’ गुंतवणूकपर मार्गदर्शन उपक्रम मंगळवार, १६ मार्चला सायंकाळी ६ वाजता होत आहे. दूरचित्र-संवाद माध्यमातून होत असलेल्या या कार्यक्रमात सहभागी तज्ज्ञांना आपले करासंबंधीचे प्रश्न विचारून शंका निरसनाची संधीही वाचकांना यानिमित्ताने मिळणार आहे.

करोना-टाळेबंदीने संथावलेले अर्थचक्र सावरत असताना, बदलत्या काळाची गरज म्हणून गुंतवणुकीचीही फेरमांडणीही आवश्यक ठरणार आहे. मात्र अशी गुंतवणूक कर-कार्यक्षम असणे हेदेखील महत्त्वाचे आहे. तसेच केवळ करबचत होते म्हणून कुठेही गुंतवणूक करण्याचा चुकीचा निर्णयही टाळला जायला हवा. सनदी लेखापाल आणि करविषयक सल्लागार प्रवीण देशपांडे आणि दीपक टिकेकर यांचे याच मुद्द्यावर होणारे मार्गदर्शन म्हणूनच उद्बोधक ठरेल, अशी अपेक्षा आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सादर झालेल्या अर्थसंकल्पातून करपात्र उत्पन्न वाढविले जाण्याच्या अथवा करांमध्ये सवलतीच्या अपेक्षांची पूर्तता होऊ शकलेली नाही. तरी कराचा वाढीव भार आलेला नाही, हेही तितकेच दिलासादायी म्हणता येईल. त्याचप्रमाणे कर वाचविण्यासाठी गुंतवणूक न करता, कमी कर भरावा लागेल अशी प्राप्तिकराची दुहेरी रचनाही यंदा कायम ठेवली गेली आहे. त्यामुळे कर वाचविणाऱ्या गुंतवणुका करणे योग्य की त्या न करताच सवलतीत कर भरणे योग्य, या संबंधाने असणारा संभ्रम दूर करण्याची संधी म्हणूनही या कार्यक्रमाकडे पाहता येईल.

‘लोकसत्ता’च्या गुंतवणूकदार-साक्षरता उपक्रमातील ‘अर्थब्रह्म’च्या आठव्या वर्षातील विशेषांकातून, अर्थातच एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन वित्त वर्षात अर्थसंकल्पानुरूप बदललेल्या गुंतवणुकीच्या गणिताच्या मांडणीचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा अंक शुक्रवारपासून (१२ मार्च) सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

(Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.)

प्रायोजक : आदित्य बिर्ला सनलाईफ म्युच्युअल फंड.

सहप्रायोजक : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लिमिटेड.

सहभागासाठी   http://tiny.cc/LS_Arthabramha_16Mar येथे नोंदणी आवश्यक

विषय : करबचतीच्या गुंतवणुकीची फेरमांडणी

सहभाग : प्रवीण देशपांडे आणि दीपक टिकेकर (सनदी लेखापाल आणि करविषयक सल्लागार)

कधी : मंगळवार, १६ मार्च २०२१

वेळ : सायंकाळी ६ वाजता