निर्बंध डावलून अनेक ठिकाणी ढोल-ताशाचा दणदणाट

मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेने जारी केलेली नियमावली पायदळी तुडवत मंगळवारी पाच दिवसांच्या गणेश विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. बेन्जो, ढोल-ताशे यांच्या गजरात काढण्यात आलेल्या या मिरवणुकांत अंतर नियम आणि मुखपट्टी वापराचे भान न राहिल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. मुख्य रस्त्यांवर पोलिसांचा बंदोबस्त असल्याने अनेक ठिकाणी गृहसंस्था, चाळीच्या आवारात तसेच अंतर्गत रस्त्यांवर मिरवणुका निघाल्या.

करोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याने करोना प्रतिबंधात्मक नियम पाळण्यासाठी सरकारी यंत्रणा सातत्याने नागरिकांना आवाहन करत आहेत. गणेशोत्सवानिमित्त गर्दी होऊन संसर्ग वाढीस लागू नये यासाठी  महापालिकेने विशेष नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार मिरवणुका, वाजंत्री यांना बंदी घालण्यात आली होती. शिवाय घरगुती गणपती असेल तर पाच आणि सार्वजनिक गणपती असेल तर केवळ दहाच जणांना विसर्जनस्थळी जाण्याची परवानगी आहे. या सर्व नियमांना गणेश भक्तांनी मंगळवारी हरताळ फासला.