पर्यावरणपूरक, विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या उत्पादनात आघाडीवर असलेल्या अमेरिकेतील टेस्ला या नामांकित कंपनीला महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करण्याचे आमंत्रण महाविकास आघाडी सरकारने दिले आहे. पुणे, औरंगाबाद, विदर्भ या भागांत प्रकल्प सुरू करण्यासाठी जागा आणि इतर सोयीसुविधा देऊ, असा प्रस्ताव राज्य सरकारच्या उद्योग विभागाने टेस्लाच्या अधिकाऱ्यांपुढे ठेवला आहे.

उद्योगचक्र गतिमान करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने काही महिन्यांपूर्वी विविध देशांतील नामांकित कंपन्यांबरोबर महाराष्ट्रात उद्योग उभारण्याबाबतचे सामंजस्य करार केले. टेस्ला कंपनीचे प्रमुख इलोन मस्क यांनी काही दिवसांपूर्वी भारतातील वाहन उद्योगात प्रवेश करण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानंतर राज्य सरकारच्या राजशिष्टाचार विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योग विभागाने टेस्लाशी संपर्क  साधला.

गुरुवारी टेस्ला कंपनीच्या वतीने रोहन पटेल (ग्लोबल डायरेक्टर, टेस्ला), डॉ. सचिन सेठ यांच्याशी आदित्य ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दूरचित्रसंवादाद्वारे संवाद साधला. या वेळी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अनबलगन, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे आदी उपस्थित होते.

टेस्ला कंपनीने वाहननिर्मिती प्रकल्प व संशोधन आणि विकास (आर अँड डी) केंद्र महाराष्ट्रात सुरू करावे. त्यांना आवश्यक त्या पायाभूत सुविधा राज्य सरकार पुरवेल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी या वेळी दिली. विजेवरील वाहनांमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. विशेषत: मुंबईत विद्युत वाहनांचा अधिक वापर झाल्यास ते पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल, असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

नवीन औद्योगिक धोरणात विजेवर चालणाऱ्या वाहननिर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे निश्चित केले आहे. याच अनुषंगाने टेस्ला कंपनीने महाराष्ट्रात प्रकल्प सुरू करावा यासाठी त्यांना विशेष सुविधांसह प्रोत्साहनपर सवलत दिल्या जातील, असे या वेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

– सुभाष देसाई, उद्योगमंत्री