अयोध्येतील राम मंदिरच्या भूमिपूजन समारंभास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रित केले जाणार असल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले आहे. या समारंभासाठी ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला जाण्याची शक्यता आहे.

माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी तसेच भाजप नेते मुरलीमनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार यांना निमंत्रण दिले जाईल, असे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कामेश्वर चौपाल यांनी नमूद केले. ट्रस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, सरसंघचालक मोहन भागवत, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची नावे निमंत्रितांच्या यादीत आहेत.

कोणी कितीही नाके मुरडली तरीही निमंत्रण आल्यास राम मंदिर उभारणीच्या भूमिपूजन समारंभास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निश्चितच उपस्थित राहतील, असे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले.  महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालत आहे, त्यात राम मंदिराचा मुद्दा नाही, अशी ‘मार्मिक’ टिप्पणीही राऊत यांनी केली.

हिंदुत्ववादी संघटना, धार्मिक नेते व राम मंदिर आंदोलनात सहभागी झालेले राजकीय पक्षांचे नेते आदी ३०० मान्यवरांना आमंत्रित केले जाणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येला जाणार की नाही, याविषयी  चर्चा सुरू आहे. त्यांनी जाऊ नये, अशी मते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भूमिका मांडताना राऊत म्हणाले, राम मंदिर हा आमच्या दृष्टीने राजकारणाचा विषय नाही, श्रद्धेचा आहे.

राष्ट्रवादीची वेगळी भूमिका

धर्मनिरपेक्ष सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी राम मंदिरच्या भूमिपूजन सोहळ्याला अयोध्येत उपस्थित राहू नये, अशी भूमिका राष्ट्रवादीचे माजी खासदार अ‍ॅड. माजिद मेमन यांनी मांडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरला ज्या श्रद्धेने शासकीय महापूजेला गेले, आमंत्रण आल्यास त्याच श्रद्धेने अयोध्येला राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी जातील.

-संजय राऊत, शिवसेना नेते