‘इंडियन प्रीमिअर लीग’मधील सामन्यांवरही मोठय़ा प्रमाणावर सट्टा लावला जात असून पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी सट्टेबाजांनी आता गुन्ह्य़ाची पूर्वीची पद्धत बदलली आहे. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी सतत खबरदारी घेणाऱ्या या सट्टेबाजांनी आपल्या प्रत्येक पंटर्ससाठी स्वतंत्र सिमकार्डे तसेच मोबाईल फोनचेही वाटप केले आहे. सट्टेबाजांना अशी शेकडो सिमकार्डे मोबाईल कंपन्यांकडून सहजगत्या उपलब्ध झाल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जागतिक फुटबॉल तसेच क्रिकेट स्पर्धेत कोटय़वधींचा सट्टा खेळणाऱ्या अनेक बडय़ा सट्टेबाजांचे मोबाईल क्रमांक पोलिसांपर्यंत पोहोचल्यामुळे त्यांना खुलेआमपणे सट्टय़ात सामील होता आले नव्हते. पंटर्सकडून आपला मोबाईल क्रमांक पोलिसांना दिला गेला असावा, असे वाटून या सट्टेबाजांनी आता या पंटर्सनाच मोबाईल व सिम कार्ड पुरविले आहे.
त्यामुळे पंटर्सऐवजी आता सट्टेबाजच स्वत: संपर्क साधणार आहेत. बडय़ा सट्टेबाजांकडून संपर्क साधला जातो तेव्हा त्यांचा क्रमांक प्राईव्हेट नंबर म्हणून झळकतो. परिणामी पंटर्सना सट्टेबाजांचे फोन आले तरी पोलिसांना त्यांचा क्रमांक कळणे कठीण असल्यामुळेच गुन्ह्य़ाची ही पद्धत त्यांनी वापरल्याचे बोलले जात आहे.
पूर्वी पंटर्सकडून सट्टेबाजांना सट्टय़ासाठी फोन केला जात असे. त्यामुळे या पंटर्सकडे सट्टेबाजांचे मोबाईल क्रमांक असत. एखादा पंटर्स पकडला गेला वा पोलिसांचा ससेमिरा मागे लागला तर पंटर्स सहजगत्या मोबाईल उपलब्ध करून देत असे. त्यामुळेच सट्टेबाजांनी ही पद्धत अवलंबिल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अधिकृत ग्राहकाला सिम कार्ड वितरीत करताना मोबाईल कंपन्यांकडून खूपच काळजी घेतली जाते. परंतु सट्टेबाजांना सहजगत्या शेकडो सिमकार्डे उपलब्ध होत असल्याबद्दल पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले असून या प्रकरणी एखादा सट्टेबाज हाती लागलाच तर संबंधित मोबाईल कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाणार असल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लवकरच धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.  

या बडय़ा सट्टेबाजांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा
 शोभन काळाचौकी, वीरेंद्र बोरिवली, ज्युनिअर कोलकाता, ज्युपिटर, अशोक रॉयल, मेट्रो, लोटस, मंडी दिल्ली, जयंती मालाड, सुनील मालाड, जेके अहमदाबाद, बाबु एरेंडा, टिकू साधना, त्रिमूर्ती, बबलू, केतन, परेश, बंटी आदी.