यंदा १२०० कोटींच्या उलाढालीची अपेक्षा; डिजिटल माध्यमांना प्रेक्षकांची पसंती

सध्या सुरू असलेल्या आयपीएलमध्ये जाहिरातींमधून सुमारे १२०० कोटींची उलाढाल अपेक्षित करण्यात आली आहे. यामध्ये यंदा डिजिटल माध्यमांवरील जाहिरातींचा वाटा वाढला असून यंदाच्या आयपीएल हंगामात डिजिटल जाहिरातींनी सुमारे १२० कोटींचा गल्ला कमाविल्याची माहिती समोर येत आहे.

टीव्हीवर आयपीएल पाहणाऱ्यांबरोबरच डिजिटल माध्यमातून आयपीएलच्या सामन्यांचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढू लागली आहे. यामुळे जाहिरातदारही या माध्यमांकडे वळू लागले आहे. सध्या हॉटस्टार या अ‍ॅपच्या माध्यमातून पाच मिनिटे उशिराने आयपीलएलच्या सामन्यांचे प्रक्षेपण केले जाते. या प्रक्षेपणादरम्यान दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. याचबरोबर यूटय़ूब, फेसबुक, ट्विटर अशा माध्यमांवरही एका-एका षटकाचे व्हिडीओज् पाहिले जातात व त्याचा प्रेक्षक वर्गही वाढत आहे. यामुळे यंदा डिजिटल  माध्यमातून देण्यात येणाऱ्या जाहिरातींची उलाढाल तब्बल १२० कोटींची झाल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण मगाच्या वर्षीच्या आयपीएलच्या तुलनेत अधिक असल्याचेही तज्ज्ञांनी नमूद केले आहे. केवळ हॉटस्टार नव्हे तर सामन्यांचा धावफलक व क्षणचित्रे दाखविणाऱ्या अ‍ॅप्सनीही यंदा जाहिरातींमध्ये कमाई केली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून पाठविण्यात येणाऱ्या नोटिफिकेशनसोबतच विविध जाहिराती झळकविल्या जाऊ लागल्या आहेत. या जाहिरातींच्या माध्यमातून अशा अ‍ॅप्सनी ५० ते ६० कोटींची उलाढाल केल्याचा अंदाज बांधला जात आहे. या वर्षी जाहिरातींवर खर्च करणाऱ्यांमध्ये विवो व मारुती या दोन मोठय़ा ब्रॅण्ड्सचा समावेश होता.  मात्र मध्यम उद्योगांनी यंदा आपला मोर्चा डिजिटल माध्यमांकडे वळविल्याचे डिजिटल जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या व्हटरेझ या कंपनीचे संस्थापक आशीष शाह यांनी सांगितले. ज्या कंपन्यांना टीव्हीवरील जाहिरातींच्या काही क्षणांसाठी लाखो रुपये खर्च करणे शक्य नव्हते अशा कंपन्यांनी यंदा डिजिटल माध्यमांची निवड करत अनेक अ‍ॅप्सच्या माध्यमातून जाहिराती केल्याचे शाह यांनी नमूद केले.

‘अ‍ॅप’च्या माध्यमातून सामन्यांचे प्रक्षेपण

हॉटस्टार या अ‍ॅपच्या माध्यमातून पाच मिनिटे उशिराने आयपीलएलच्या सामन्यांचे प्रक्षेपण केले जाते. या प्रक्षेपणादरम्यान दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. याचबरोबर अनेक बडय़ा कंपन्यांनी त्यांच्या डिजिटल जाहिरातींच्या आर्थिक तरतुदीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढ केल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.