इंडियन प्रिमियर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या सीझनवर करोनाचं सावट आहे. येत्या २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेला याचा फटका बसणार आहे. कारण, राज्य सरकारकडून महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या तिकीटांवर बंदी घातल्याची माहिती सुत्रांकडून कळते आहे. याबाबत राज्य सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर शुभारंभाचा सामना होणार आहे.

जगातील सर्वात मोठी क्रिकेटची T20 लीग असणाऱ्या आयपीएल स्पर्धेदरम्यान, करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच राज्य सरकारकडून तिकीट विक्रीवर बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे कळते. मात्र, प्रेक्षकांविना आम्ही सामने खेळवू शकतो अशी कोणतीही अधिकृत सूचना अद्याप आयपीएलकडून आली नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

करोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी कर्नाटक सरकारने बंगळूरूमध्ये आयपीएलचे सामने खेळवले जावेत किंवा नाही याबाबत पत्राद्वारे केंद्र सरकारचा सल्ला घेतला आहे. याबाबत कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, “शेजारचे राज्य महाराष्ट्राने देखील याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर केंद्राच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत.”

दरम्यान, करोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा १३वा हंगाम रद्द करण्यात यावा अशी याचिका मद्रात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. बीसीसीआयने ही स्पर्धा रद्द करावी असे आदेश केंद्र सरकारने द्यावेत, असा आदेश न्यायालयाने द्यावा असे या याचिकेत म्हटले आहे.

आयपीएलच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही – बीसीसीआय

दरम्यान, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आयपीएलच्या वेळापत्रकात कुठलाही बदल करण्यात आला नसल्याचे स्पष्ट केले आहे. सामन्यांच्यावेळी खेळाडू आणि प्रेक्षकांना या विषाणूची लागण होऊ नये म्हणून सर्व प्रकारची प्रतिबंधात्मक काळजी घेतली जाईल. त्यासाठी मेडिकल टीमही कार्यरत असेल असेही गांगुली यांनी स्पष्ट केले आहे.