मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या स्फोटक पत्रामुळे राज्यातच नव्हे तर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या आठवड्यात परमबीर सिंग यांनी पाठवलेल्या पत्रात असे लिहीले आहे की, महाराष्ट्रचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि इतर पोलिस अधिकाऱ्यांना मुंबईतील बार व हॉटेल्समधून ५० कोटी ते ६० कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले. या प्रकारे दरमहा एकूण १०० कोटी रुपये जमा करावेत असा आदेश देखील दिला होता.

सोमवारी, परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली होती.

महाराष्ट्रातील हे वसुली नाटक रंगत असतानाच, आमिर खानच्या सत्यमेव जयते कार्यक्रमाची एक क्लिप इंटरनेटवर व्हायरल झाली आहे. व्हिडिओ त्या भागाचा आहे ज्यात आयपीएस अधिकारी संजय पांडे बोलताना दिसत आहेत. पोलिस घेत असलेल्या लाच याविषयी ते बोलत आहेत. ते पुढे हे पण सांगत आहेत की, ही लाच सिस्टमध्ये कशा प्रकारे वितरित केली जाते’.

व्हिडिओमध्ये आमिर खान म्हणतो, “पोलिस अधिकारी, कॉन्स्टेबल हे सामान्य माणूस, ऑटोरिक्षा चालक इत्यादींकडून लाच घेताना आपण बऱ्याच वेळा पाहतो. आपण म्हणतो की त्यांचा पगार खूप कमी आहे, पण आमच्यासारख्या सामान्य माणसांकडून जमा केलेली रक्कम फारच मोठी असते याचा अर्थ त्याचा कमाई चांगलीच होत असावी.”

यावर आयपीएस संजय पांडे उत्तर देतात की, “जर हे लोकांकडून वसूल केलेले पैसे कुणा एका व्यक्तीकडे राहिले असते, तर मी या गोष्टी वर सहमत आहे. गोळा केलेली संपूर्ण रक्कम तोघरी घेऊन जात असेल यावर मला विश्वास नाही.”

त्यानंतर आमिर अधिकाऱ्याला विचारतो की, वसूल केलेल्या पैशांचे काय होते, ते कुठे जातात? यासंदर्भात आयपीएस पांडे म्हणतात, “आपण सर्व लोकशाहीमध्ये राहात आहोत. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की वरिष्ठांची क्रमवारी असते. मग त्यावर आपले राजकारणी येतात. ही एक साखळी आहे आणि या साखळीत …”

नक्की वाचा >>“…तर १०० कोटीत प्रत्येकाचा वाटा आहे”; भाजपा नेत्याचा अप्रत्यक्षपणे पवारांवर निशाणा

आमिर खान चिडवण्याच्या स्वरात म्हणतो, “तुम्हाला असे म्हणायचे आहे का की या पैशाचे वाटप होते.”

यासंदर्भात आयपीएस पांडे उत्तर देतात, “होय. मी हे अजून व्यवस्थितपणे समजावून सांगतो. सामान्य माणसांच्या मते भ्रष्टाचाराचे दोन प्रकार आहेत. एक आहे असंघटित प्रकार . (उदाहरणार्थ) रस्त्यावर, तुम्हाला तुमचा परवाना मागितला जातो परंतु तुमच्याकडे तो नसल्यामुळे तुम्ही काहीतरी तडजोड करता. म्हणून हे थोडेसे असंघटित आहे. पोलिसांना हे माहित नाही की ते किती लोकांना पकडतील, त्यांच्याकडून किती रक्कम मिळेल, या गोष्टी बदलत असतात. त्या असंघटित असतात. त्यानंतर बर्‍याच गोष्टी अशा आहेत की ज्या संघटितपणे केल्या जातात. उदाहरणार्थ आमच्याकडे रेस्टॉरंट्स, एफएल -३ परवाने, दारूची दुकाने, बार आहेत. महाराष्ट्रात मिनी डान्स बार आहेत. त्यांच्यावर बंदी आहे पण अजूनही काही ठिकाणी ती सुरू आहेत. ही झाली संघटित सेटलमेंट, संस्थात्मक वसूली. प्रमुख वितरण … याचा अंदाज जवळजवळ प्रत्येकाला असतो.”

आमीर खान मध्येच विचारतो, “म्हणजे काही ठरावीक रक्कम अपेक्षित असतेच काय़”, यावर पांडे म्हणतात, “हो ती तर अपेक्षितच असतेच.”