आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी कुख्यात गुंड इक्बाल मेमन उर्फ इक्बाल मिर्चीची पत्नी आणि दोन मुलांना विशेष न्यायालयाने शुक्रवारी फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले. आतापर्यंत हिरेव्यापारी नीरव मोदी  आणि व्यावसायिक विजय मल्या यांना फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले आहे.

या तिघांना फरारी आर्थिक गुन्हेगार घोषित करावे, अशी मागणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयाकडे केली होती. ईडीचा याबाबतचा अर्ज विशेष न्यायालयाने शुक्रवारी मान्य करत मिर्चीची पत्नी हजरा आणि मुले जुनैद व असिफ या तिघांना फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे ईडी या तिघांच्या मालकीची मालमत्ता जप्त करू शकते.

वारंवार हजर राहण्याचे आदेश देऊनही तिघेही ईडी तसेच न्यायालयासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे या तिघांना फरारी आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्याच्या मागणीसाठी ईडीने विशेष न्यायालयात अर्ज केला. तिघांवर मिर्चीच्या २०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा बेकायदा व्यवहार केल्याचा आरोप आहे.