नवी मुंबईतील नागरिकाला सात हजारांची भरपाई देण्याचे ग्राहक न्यायालयाचे आदेश
तीन वर्षांपूर्वी गाडीचे चुकीचे वेळापत्रक देणाऱ्या आणि नंतर खोटे बोलणाऱ्या ‘आयआरसीटीसी’ला नवी मुंबई येथील रहिवाशाने ग्राहक न्यायालयात खेचून तडाखा दिला आहे. सेवेत कुचराई केल्याचा ठपका ठेवत ग्राहक न्यायालयाने ‘आयआरसीटीसी’ला सात हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
गोपाळ बजाज यांनी २०१३ मध्ये संकेतस्थळावरून नागपूर-मुंबई एक्स्प्रेस या गाडीचे तिकीट बुक केले होते. ठरल्या दिवशी म्हणजेच ५ मे २०१३ रोजी मुंबईला येण्यासाठी बजाज हे सायंकाळी सात-सव्वासातच्या सुमारास अमरावती स्थानकावर पोहोचले. गाडीची वेळ सायंकाळी ७.४० वाजता होती. परंतु गाडी साडेचार तास उशिराने अपेक्षित असल्याचे त्यांना ‘आयआरसीटीसी’च्या संदेशाद्वारे कळवण्यात आले. त्यामुळे बजाज यांनी तातडीने दुसऱ्या गाडीचे सर्वसाधारण डब्याचे तिकीट काढले.
मुंबईला परतल्यावर त्यांनी ‘आयआरसीटीसी’कडे नागपूर-मुंबई एक्स्प्रेसच्या तिकिटासाठी भरलेले पैसे परत करण्याची विनंती केली. परंतु नागपूर-मुंबई एक्स्प्रेस ही निश्चित वेळेनुसारच धावत होती, असे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे बजाज यांनी दिल्ली येथील ‘आयआरसीटीसी’च्या मुख्य कार्यालयात माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करत ‘त्या’ दिवशीच्या गाडीच्या स्थितीचे वेळापत्रक मागितले. त्यावर ‘त्या’ दिवशी गाडी निश्चित वेळेपेक्षा उशिराने धावत होती, असे मुख्यालयाकडून बजाज यांना कळवण्यात आले. तसेच त्यांना तिकिटाचे पैसेही परत करण्यात आले.
मात्र, घडल्या प्रकाराने संतापलेल्या बजाज यांनी ‘आयआरसीटीसी’विरोधात ठाणे ग्राहक न्यायालयात तक्रार केली. पहिल्या वेळेस चुकीची माहिती दिल्यामुळे दुसऱ्या गाडीच्या तिकिटाचे भाडे, माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करण्यासाठी आलेला खर्च, या सगळ्या प्रकारामुळे झालेला मनस्ताप आणि कायदेशीर लढाईच्या खर्चाचीही मागणी केली. ‘आयआरसीटीसी’ने माहितीच्या अधिकाराखाली दिलेली माहिती आणि तिकिटाचे पैसे परत केल्याने ‘त्या’ दिवशी गाडी उशिराने धावत असल्याची बाब ग्राहक न्यायालयाने मान्य केली. त्यामुळेच ‘त्या’ दिवशी गाडी उशिराने धावत असल्याचे ‘आयआरसीटीसी’ने खोटे सांगून सेवेत कुचराई केल्याचा ठपका न्यायालयाने ठेवला. तसेच बजाज यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल पाच हजार रुपयांची नुकसान भरपाई, दोन हजार रुपये कायदेशीर लढाईचा खर्च म्हणून, तर नव्या तिकिटाचे १८० रुपये असे एकूण सात हजार रुपये परत करण्याचे आदेशही दिले.