करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्यानंतर २५ मार्चपासून बंद झालेली रेल्वेची प्रवासी वाहतूक आजपासून (१२ मे) टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. सुरुवातीला नवी दिल्लीहून ये-जा करणाऱ्या १५ राजधानी मार्गावर या फेऱ्या पूर्ण क्षमतेनिशी धावणार आहेत. रेल्वेने नवी दिल्लीतून देशभरातील विविध ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या एकूण ३० फेऱ्या चालवण्यासाठी रविवारी मंजुरी दिली. १५ मोठ्या शहरांमधून या रेल्वेगाड्या धावतील.

आरक्षण फुल्ल :-
या गाड्यांचे आरक्षण आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर ११ मे पासून सायंकाळी ४ वाजता सुरू झाले. मात्र या गाड्यांची माहिती मिळवण्यात व आरक्षण करण्यात तांत्रिक अडचणी येऊ लागल्या. संकेतस्थळही सुरू होत नव्हते. नंतर रेल्वेने आरक्षण सायंकाळी ६ वाजता सुरू करत असल्याचे स्पष्ट केले. आरक्षण सुरू होताच गाड्या हाऊसफुल्ल झाल्या. मुंबई सेन्ट्रल टर्मिनसमधून नवी दिल्लीसाठी सुटणाऱ्या गाडीचे आयआरसीटीसीवर (इंडियन रेल्वे कॅ टरिंग टूरिझम कॉपरेरेशन) आरक्षण सुरू होताच काही मिनिटांत तिचे आरक्षण पूर्ण झाले. १८ मे पर्यंतच्या या गाडीचे आरक्षण फुल्ल असल्याची माहिती रेल्वेने दिली.

नवी दिल्ली- मुंबई सेंट्रल स्पेशल ट्रेन  :-
दरम्यान, मुंबईतून पहिली गाडी आज(दि.१२) मंगळवारी सुटेल. गाडी क्रमांक ०२९५१ मुंबई सेन्ट्रल येथून सायंकाळी ५.३० वाजता सुटणार आहे आणि नवी दिल्ली येथे बुधवारी सकाळी ९.०५ वाजता पोहोचेल. तर, गाडी क्रमांक ०२९५२ नवी दिल्ली येथून सायंकाळी ४.५५ वाजता सुटून मुंबई सेन्ट्रलला दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी सुरत, वडोदरा, रतलाम व कोटा येथे थांबेल. या गाड्या दररोज धावणार आहेत. याशिवाय नवी दिल्लीहून मडगावसाठीही रेल्वे गाडी १५ मेपासून धावणार असून रत्नागिरी, पनवेल अन्य तीन स्थानकात तिला थांबा दिला आहे.

वेळापत्रक :-

Special Train Details 12-05-20 by The Indian Express on Scribd


तिकीट किती आणि प्रवासाचे नियम :-
– पहिल्या टप्प्यात नवी दिल्लीहून मुंबई सेंट्रलसह देशभरातील १५ राजधानी मार्गावर ३० फेऱ्या धावणार आहेत.

  • या सर्व गाडय़ा पूर्णपणे वातानुकूलित राहणार असून संपूर्ण प्रवासी क्षमतेसह (एका डब्यात ७२ प्रवासी) या गाडय़ा धावतील.
  • तसेच राजधानी एक्सप्रेसच्या तिकीटादराप्रमाणे भाडे आकारले जाईल असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
  • सर्व प्रवाशांना नाकातोंडावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील.
  • करोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांनाच प्रवासाला परवानगी देण्यात येईल.
  • तसेच, प्रवाशांना ‘आरोग्यसेतू’ अ‍ॅप अनिवार्य असेल.
  • या रेल्वेगाडय़ा राजधानी दर्जाच्या असल्या तरी, प्रवाशांना चादरी आणि बेडशिट पुरवले जाणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
  • तसेच डब्यांतील वातानुकूलनाचे प्रमाण कमी असेल व ताज्या हवेचा पुरवठा जास्तीत जास्त होईल, याची दक्षता घेण्यात येईल.
  • या गाडय़ांसाठी केवळ ऑनलाइन तिकीट नोंदणी तेही IRCTC च्या संकेतस्थळावरुनच बूकिंग करता येईल.
  • रेल्वे स्थानकांतील आरक्षण सुविधा व तिकीट खिडक्या बंदच राहतील.
  • निश्चित (कन्फर्म) तिकीट असलेल्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाईल.
  • प्रवाशांची स्थानकात प्राथमिक तपासणी करण्यात येईल.