ई-तिकिटांचे आरक्षण सुरू होताच प्रवाशांकडून अवघ्या काही सेकंदात मोठय़ा प्रमाणात तिकिटे आरक्षित केली जातात. शुक्रवारी मात्र  रेल्वेच्या तांत्रिक चुकीमुळे एका गणपती विशेष गाडीची काही ई-तिकिटे आरक्षणाच्या नियोजित वेळेआधीच आरक्षित झाल्याचा अजब प्रकार समोर आला. सुमारे ५० मिनिटे आधीच आरक्षणाची संधी उपलब्ध होताच जवळपास १३५ तिकिटे आरक्षित झाली. यामुळे गोंधळ होताच यंत्रणेत चुकीची तारीख आणि वेळ नोंदवली गेल्याने हा प्रकार झाल्याचे मध्य रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.

मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून गणपती विशेष गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यातील काही गाडय़ांचे आरक्षण हे २० जुलैपासून सुरू झाले आहे. यात पश्चिम रेल्वेवरील सहा आणि मध्य रेल्वेवरील तीन गाडय़ांचा समावेश आहे. नियमानुसार नऊ गाडय़ांचे आरक्षण सकाळी आठ वाजता सुरू होणे अपेक्षित होते. मात्र यातील ट्रेन ०९००७ मुंबई सेन्ट्रल ते बिकानेर जंक्शन विशेष गाडीचे तिकीट आरक्षण सकाळी ७.१० वाजता सुरू  झाले. आरक्षण सुरू होताच सकाळी आठ वाजेपर्यंत १३५ तिकिटे आरक्षित झाली. ही बाब समोर येताच मध्य रेल्वे प्रशासनाचे धाबेच दणाणले. मुळात ज्या गाडय़ांचे आरक्षण आधीच सुरू झालेले असते, अशा गाडय़ांचे आरक्षण २१ तास प्रवाशांसाठी उपलब्ध असते. तर ज्या गाडय़ा त्या तारखेपासून आरक्षणासाठी उपलब्ध होणार आहेत, त्यांचे आरक्षण हे सकाळी आठ वाजताच सुरू होते. मात्र शुक्रवारी मुंबई सेन्ट्रल ते बिकानेर जंक्शन विशेष गाडीचे आरक्षण आधीच उपलब्ध झाले. त्यामुळे प्रवाशांनी ८ सप्टेंबर रोजीची १३ तिकिटे, १० सप्टेंबरची ११९ आणि १५ सप्टेंबरची तीन तिकिटे आरक्षित केली होती. ही पश्चिम रेल्वेवरून धावणारी आहे.