तीन वर्षांत आरक्षण करणाऱ्या दोन कोटी ६२ लाख प्रवाशांची नव्याने भर

तिकीट खिडक्यांच्या रांगेतून प्रवाशांची होणारी सुटका आणि सहजतेने घरबसल्या उपलब्ध होणारे लांब पल्ल्याचे तिकीट पाहता आयआरसीटीसीच्या (इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉपरेरेशन)संकेतस्थळावरून तिकीट काढण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत संकेतस्थळावरून तिकीट आरक्षित करणाऱ्यांमधे आणखी दोन कोटी ६२ लाख ८० हजार प्रवाशांची नव्याने भर पडली आहे. त्यामुळे संकेतस्थळाद्वारे तिकीट आरक्षण करताना प्रवाशांना येणाऱ्या वेटिंग लिस्टच्या कटकटीत आणखी भर पडली आहे. संकेतस्थळावर पडणारा ताण पाहता भविष्यात आणखी काही बदल करण्याचा विचार केला जाईल, असे आयआरसीटीसीतील सूत्रांकडून सांगण्यात आले.

आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून सध्या तीन महिने आधीचे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध आहे. देण्यात येणाऱ्या सध्याच्या सुविधांमुळे प्रवाशांना त्याचा बराच फायदा होत आहे. त्यामुळे या संकेतस्थळाला तिकीट काढण्यासाठी प्रवाशांकडून प्रथम पसंती दिली जाते. प्रवाशांच्या मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादामुळे संकेतस्थळावर ताण वाढत गेला. वाढत जाणारा ताण पाहता त्यानुसार २०१६ मधे संकेतस्थळ विकसित करण्याचा निर्णय घेतला. संकेतस्थळ विकसित करताना तिकीट क्षमता वाढवण्यात आली. पूर्वी प्रत्येक मिनिटाला तीन हजार तिकीट आरक्षित केले जात असतानाच संकेतस्थळ विकसित केल्यानंतर हीच क्षमता पाच ते सहा हजापर्यंत गेली. त्या वेळी विकसित करण्यासाठी तब्बल १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. केलेल्या बदलांमुळे तिकीट जलद गतीने आरक्षित होऊ लागली. या संकेतस्थळावरून २०१४-१५ मध्ये दिवसाला पाच लाख एक हजार तिकिटे काढली जात होती. यानंतर २०१६-१७ मध्ये हीच संख्या ५ लाख ७३ हजारांपर्यंत पोहोचली. सध्याच्या घडीला २० कोटी ९१ लाख ४५ हजार प्रवासी संकेतस्थळाचा वापर करीत आहेत. २०१४-१५ मध्ये हाच आकडा १८ कोटी २८ लाख ६५ हजार एवढा होता, अशी माहिती देण्यात आली.

  • नुकतीच महिन्याला सहा तिकीट काढण्यासाठी असलेला आधार कार्ड जोडणीचा नियमही शिथिल करण्यात आला. १२ तिकीट काढण्याची मुभा देत त्यासाठी आधार कार्डची माहिती द्यावी लागणार आहे. त्यामुळे एका प्रवाशाला १२ तिकिटेही काढता शक्य होणार असल्याने प्रवाशांना त्याचा मोठा फायदा मिळणार आहे. यामुळेही मोठय़ा प्रमाणात तिकिटे काढली जात आहेत.