शिवसेना आमदार हेमंत पाटील यांचा दावा; प्रवाशांची मात्र कुचंबणा
देवगिरी एक्सप्रेसमध्ये बाजूची शयनआसने मिळाल्यामुळे संतापलेल्या लोकप्रतिनिधींना केलेला ‘देवगिरी रोको’ हा फक्त आसनांसाठी नसल्याचा दावा या आमदारांनी केला आहे. ही गाडी प्रवाशांच्या सेवेसाठीच तासभर खोळंबून ठेवल्याचे अजब स्पष्टीकरण आमदारांनी पुढे केले आहे. आमदारांसाठी राखीव डब्यात इतर प्रवाशांचाच भरणा जास्त होता, देवगिरी एक्सप्रेसमध्ये स्वच्छता नसते, पाण्याचे दुर्भिक्ष्य असते, उंदरांचा मुक्त संचार असतो अशा अनेक तक्रारी मांडत या आमदारांनी रेल्वेवर हल्ला चढवला आहे. मात्र, केवळ याच गाडीचा नाही, तर इतर दोन मेल-एक्सप्रेस आणि चार जलद गाडय़ांचा खोळंबा फक्त चांगली आसने मिळावीत, यासाठीच केला असल्याचा दावा रेल्वेने केला आहे.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मराठवाडय़ातील काही आमदार रात्री ९.१०च्या देवगिरी एक्सप्रेसने आपापल्या मतदारसंघांत निघाले. मंत्रालयातून रेल्वेला ३८ आमदारांच्या आसनांची प्रवासी कुपन्स मिळाली होती. त्यानुसार रेल्वेने ४६ आसनांचा वातानुकुलित टू टायर डबा जोडला. मंत्रालयातून पाठवलेल्या यादीत ज्या क्रमाने नावे असतात, त्या क्रमाने आसने त्या त्या आमदाराला दिली जातात. या डब्यात १६ आसने बाजूला असून उर्वरित ३० आसने एकत्र असतात.
बुधवारी रात्री शिवसेनेचे नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांनी गाडी सुटण्याआधी गाडीतील साखळी खेचून गाडी थांबवली.
आमदारांच्या डब्यात भलतेच लोक बसले असून आमदारांना बाजूची तसेच वरची अडचणीची आसने दिल्याचा दावा त्यांनी केला. त्यानंतर हे मानापमान नाटय़ तब्बल पाऊण तास चालले. अखेर रात्री ९.५३च्या सुमारास गाडी निघाली. मात्र गाडी मशिदपर्यंत पोहोचते तोच पाटील यांनी पुन्हा साखळी खेचून गाडी थांबवली. अखेर गाडी १०.१०च्या सुमारास निघाली.
याबाबत रेल्वे प्रशासनाला विचारले असता, मंत्रालयातून आम्हाला आमदारांची नावे व कुपन्स येतात. त्यानुसार आम्ही त्यांच्यासाठी आरक्षण करतो.
आता आमदारांच्या कुपन्सवर खुद्द आमदार प्रवास करतात की इतर कोणी, हे तपासणे रेल्वेचे काम नाही. अनेकदा आमदारांना त्यांचे ओळखपत्र विचारणे हादेखील त्यांना हक्कभंग वाटतो. पण बुधवारी पाटील यांच्या तक्रारीप्रमाणे खास आमदारांसाठीच्या या डब्यात इतर प्रवासी असतील, तर आमदारांसाठी देण्यात येणाऱ्या कूपन्सचा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट आहे. अशा वेळी आम्हाला कठोर कारवाई करावी लागेल, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. पण वैयक्तिक मानापमानासाठी हजारो प्रवाशांचा खोळंबा करणे योग्य नसल्याची टीकाही रेल्वेतील काही अधिकाऱ्यांनी
केली.

आंदोलन प्रवाशांसाठीच – पाटील
हा प्रकार अचानक घडलेला नाही. देवगिरी एक्सप्रेसमध्ये स्वच्छतेची वानवा असते. या गाडीतील चादरी कधीच धुतलेल्या नसतात, गाडीत उंदीर मुक्त संचार करत असतात. या सर्वाबाबत रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. आमदारांच्या डब्यात आमदारांना डावलून इतरांना जागा देण्यात रेल्वेतील दलालांचा हात आहे. त्याविरोधात सामान्य प्रवाशांसाठीच हे आंदोलन आहे असा दावा हेमंत पाटील यांनी केला आहे.

Troubled by unruly rickshaw driver at Panvel station Suffering continues despite taking action
बेशिस्त रिक्षाचालकांचा पनवेल स्थानकात अडसर; कारवाई करूनही मुजोरी कायम, प्रवाशांचे हाल
Men travel in womens coaches Safety of women passengers of air-conditioned local at risk
मुंबई : महिला डब्यातून पुरुषांचा प्रवास, वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
Steel Benches on Dombivli Railway Station with courtesy of Srikant Shinde
डोंबिवली रेल्वे स्थानकात ‘बाकड्यांच्या’ माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार
Inconvenient as Sinnar buses go directly from the flyover without stopping at small villages
नाशिक: लहान गावांच्या थांब्यांना बससेवेची हुलकावणी