विनोदी अभिनेता कपिल शर्माच्या अनधिकृत बांधकामाबाबतची खरी माहिती उघड झाल्यानंतर त्याने गोरेगाव येथील एका इमारतीतील सदनिकेतही अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आले. तसेच याच इमारतीत बॉलीवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता इरफान खान यानेही त्याच्या सदनिकेत अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले असून पालिकेने या दोघांनाही नोटीस बजावली आहे. तसेच कपिल शर्माच्या विरोधात समाजवादी पक्ष व मनसेनेही आक्रमक भूमिका घेत त्याच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा व पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला असून कपिलच्या अडचणीत वाढ झाली आहे.

कपिल शर्मा याने ट्वीट करून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बांधकामासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता. या आरोपामुळे पालिकेतील भ्रष्टाचार उघडकीस आला. त्याचबरोबर शर्मा यानेही अनधिकृत बांधकाम केल्याचे उघडकीस आले. आपले अनधिकृत बांधकाम पालिकेने जमीनदोस्त केल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर शर्मा यांनी ट्वीट केल्यामुळे तो अडचणीत आला. तर कपिल शर्माच्या पाठोपाठ अभिनेता इरफान खान यानेही आपल्या सदनिकेत अनधिकृत बांधकाम केल्याचे समोर आले असून त्याच इमारतीत कपिल शर्मा याचीही अनधिकृत बांधकाम केलेली सदनिका आहे. या अनधिकृत बांधकामांप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने या दोनही अभिनेत्यांना नोटीस बजावली आहे. गोरेगाव पश्चिम येथील ओशिवरा ग्रीन पार्क, डीएचएल इन्नलेव्ह या १६ मजली इमारतीमधील डक्ट व कारडेकची जागा सदनिकेत समाविष्ट केल्यामुळे अभिनेता इरफान खानसह कपिल शर्मा व अन्य सदनिकाधारकांवर एप्रिलमध्ये नोटीस बजावण्यात आल्याचे पी-दक्षिण विभागाचे साहाय्यक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांनी सांगितले. दरम्यान, या नोटिशीच्या विरोधात बांधकाम व्यावसायिक नगर दिवाणी न्यायालयात गेला होता. त्यामुळे येथील सदनिकाधारकांना काही दिवसांकरिता दिलासा मिळाला. दरम्यान, पालिका कपिल शर्माच्या अंधेरी येथील मालमत्तेमुळे खारफुटीचे नुकसान झाल्याने त्याच्याविरोधात जिल्हाधिकारी व वन खात्याला पत्राद्वारे कळवणार आहे. तसेच सहा महिन्यांपूर्वी हा प्रकार घडल्यानंतर पालिकेने संबंधित विभागांना कळवल्याचेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.

राजकीय पक्ष आक्रमक

कपिल शर्मा अनधिकृत बांधकामप्रकरणी राजकीय पक्ष आक्रमक झाले असून समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते रईस शेख यांनी कपिल शर्माने पाच लाखांची लाच घेतल्याचे भ्रष्टाचाराचे आरोप करून पालिकेची प्रतिमा मलिन केल्याचे सांगत त्याच्यावर अब्रूनुकसानीची नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तपासासाठी कागदपत्रे सादर करण्यासाठी पालिकेने तीन दिवसांची मुदत देऊनही कपिल शर्मा याने ती सादर केलेली नाहीत, असेही त्यांनी सांगितले. समाजवादी पक्षापाठोपाठ मनसेही शर्माविरोधात आक्रमक झाली आहे. कपिल शर्माविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मनसेचे पालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांनी सांगितले.