News Flash

सिंचनात दडलेय तरी काय?

सुमारे ७० हजार कोटी खर्च केल्यावर सिंचनाचे वाढलेले क्षेत्र किती यावरून राज्याचे राजकारण मागच्या सरकारच्या काळात ढवळून निघाले असताना,

| March 18, 2015 01:24 am

सुमारे ७० हजार कोटी खर्च केल्यावर सिंचनाचे वाढलेले क्षेत्र किती यावरून राज्याचे राजकारण मागच्या सरकारच्या काळात ढवळून निघाले असताना, नव्या सरकारने सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात ‘आकडेवारी उपलब्ध नाही’, असा पवित्रा घेत  सिंचनाखालचे नक्की क्षेत्र किती यावर भाष्य टाळले आहे. भाजप आणि राष्ट्रवादीमधील वाढत्या जवळिकीमुळे, राष्ट्रवादी अडचणीत येणार नाही अशी काळजी भाजप सरकारने घेतली का, अशी कुजबुज मग सुरू झाली.
आर्थिक पाहणी अहवालात सिंचन, कृषी आणि महसूल या खात्यांनी केलेल्या संयुक्त पाहणीतून सिंचनाखालील क्षेत्र किती याची आकडेवारी दरवर्षी सादर केली जात असे. तीन वर्षांपूर्वी सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात सिंचनाच्या क्षेत्रात दहा वर्षांमध्ये फक्त ०.१ टक्के वाढ झाल्याची आकडेवारी राज्याच्या राजकारणात भलतीच वादळी ठरली होती. हजारो कोटी खर्च करूनही सिंचन क्षेत्र वाढलेले नाही, मग पैसा गेला कुठे, अशी ओरड झाली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली आणि त्यातून काँग्रेस-राष्ट्रवादीतील कटुता वाढत गेली. गेली दोन वर्षे राष्ट्रवादीकडे वित्त खाते असताना सिंचनाच्या क्षेत्रात किती वाढ झाली याची आकडेवारी देण्याचे टाळण्यात आले होते. नाहक वाद नको म्हणून राष्ट्रवादीने ही खबरदारी घेतली होती.
भाजप-शिवसेना युतीच्या सरकारच्या वतीने सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालात सिंचनाच्या क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध नाही, असे नमूद करण्यात आले आहे. २०१०-११ ते २०१३-१४ या आर्थिक वर्षांत सिंचन क्षेत्र किती वाढले याची माहिती उपलब्ध नाही, अशी माहिती अहवालात देण्यात आली आहे.

सिंचन वाढल्याचादावा
पाटबंधारे, कृषी आणि महसूल खात्यांच्या संयुक्त पाहणीच्या आधारे क्षेत्रात किती वाढ झाली याची आकडेवारी दिली जाते. मात्र, सिंचन खात्याने वर्षभरात आठ लाख हेक्टर्स सिंचनात वाढ झाल्याची माहिती दिली आहे. २०१२-१३ या वर्षांत २४.४८ लाख हेक्टर्स सिंचन झाले होते, तर २०१३-१४ या वर्षांत हे क्षेत्र ३२.६० लाख हेक्टर्स झाल्याची आकडेवारी देण्यात आली आहे. या माहितीबरोबर ही फक्त जलसंपदा खात्याची आकडेवारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 1:24 am

Web Title: irrigation figures not available in maharashtra economic survey report
टॅग : Irrigation
Next Stories
1 आश्चर्य, शंका आणि कुतूहल..
2 महानंदच्या अध्यक्षांसह सात जणांवर कारवाई
3 नाटय़संमेलनाचेही फुकट प्रक्षेपण करा!
Just Now!
X