मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निकालांनंतर आक्रमक झालेल्या शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले आहे. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात आम्ही काय खावे व खाऊ नये, हे सांगण्यापर्यंत अनेकांची मजल गेली. मात्र, आम्हाला शहाणपणा शिकवणारे हे लोक गोव्यात जाऊन शाकाहाराचा आग्रह धरण्याची हिंमत दाखवतील का, असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून विचारण्यात आला आहे.

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातच पुन्हा एकदा मराठी माणसाला डिवचण्याचे कारस्थान सुरू झाले. मुंबई आणि अलीकडच्या महापालिका निवडणुकांतही जात आणि धर्माचा विखारी प्रचार झाला. वास्तविक जैन समाज म्हणा किंवा बांधव, आम्ही कधीच त्यांच्या अंगावर गेलो नाही. उलट आजपर्यंत सगळय़ांनाच हिंदू म्हणून सांभाळून घेत आलो. मात्र अलीकडे महाराष्ट्रात आम्ही काय खावे व खाऊ नये, हे सांगण्यापर्यंत यांची मजल गेली, असे सांगतानाच बाजूच्याच गोव्याला जाऊन जरा बघा. भाजपच्याच राज्यात इथे मुबलक ‘बीफ’ मिळत आहे. इथे महाराष्ट्रात आम्हाला शहाणपणा शिकवणाऱ्यांनी गोव्यात जाऊन पूर्ण शाकाहारी राज्य आणावे. बोला, आहे का हिंमत?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. इथे तुम्ही एकगठ्ठा मतांची मस्ती दाखवणार असाल तर ती तुम्हालाच लखलाभ ठरो. पण पैशाची मस्ती दाखवून अंगावर याल तर, ते मात्र आता मराठी माणूस सहन करणार नाही, असा इशाराही या अग्रलेखातून शिवसेनेने दिला आहे.

‘मनी’ आणि ‘मुनी’च्या जोरावर भाजपने मिरा-भाईंदर जिंकले- शिवसेना

काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार टीका केली होती. ‘मनी’ आणि ‘मुनी’च्या जोरावर भाजपने मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक जिंकली, असा घणाघाती आरोप त्यांनी केला होता. भाजपने मिरा-भाईंदरची निवडणूक जिंकण्यासाठी जैन मुनींची मदत घेतली. या जैन मुनींनी जातीच्या आधारावर मते मागितली. त्यामुळेच भाजपला निवडणुकीत इतका मोठा विजय मिळाला. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतांच्या राजकारणासाठी एखाद्या जैन मुनीसमोर लोटांगण घालणे, हा आचारसंहितेचा भंग आहे. शिवसेनेनेही या निवडणुकीत आठ जागांवर जैन समाजातील उमेदवार उभे केले होते. त्यापैकी एक उमेदवार जिंकला तर अन्य सात उमदेवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. अमराठी समाज शिवसेनेच्या पाठिशी नाही, असा प्रचार केला जात आहे. या मतदारांना शिवसेनेपासून तोडण्यासाठीचा हा डाव आहे. मात्र, यापुढे शिवसेनेविरोधात एक शब्दही उच्चारला तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असे राऊत यांनी ठणकावले होते.

व्यक्तिकेंद्रित राजकारण यशस्वी!