”ठाकरे सरकारच्या काळात पालघर साधू हत्याकांडावर आवाज उठवणं, न्याय मागणं गुन्हा आहे का? लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार राम कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यातून राज्यात जुलमी राजवट सुरु असल्याचे दिसून येते.” अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

भाजपा नेते राम कदम यांच्या जनआक्रोश आंदोलनास परवानगी नाकारत, पोलिसांनी आज त्यांना ताब्यात घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

”पालघरला जी साधुंची हत्या झाली. त्यासंदर्भात आवाज उठवणं, न्याय मागणं देखील ठाकरे सरकारच्या काळात गुन्हा झाला आहे. लोकप्रतिनिधी राम कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर, पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं. मला वाटतं यातुनच राज्यात जुलमी राजवट याचा प्रत्यत पुन्हा एकदा आला आहे. परंतु, तुम्ही कितीही मुस्कटदाबी करा, कितीही लोकांना अटक करा. या राज्यात साधु-संतांसाठी हिंदुत्वासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी भाजपा व महाराष्ट्रप्रेमी कार्यकर्ते, हिंदुत्वप्रेमी कार्यकर्ते लढत राहतील, आपल्याला जाब विचारतील.” असं दरेकर यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओत म्हटलं आहे.

दरम्यान, या अगोदर आज सकाळी पालघर हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीसाठी भाजपा आमदार राम कदम यांनी जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. मात्र, ही यात्रा निघण्या अगोदरच राम कदम यांना पोलिसांनी त्यांच्या निवास्थानावरून ताब्यात घेतलं होतं. यानंतर भाजपा नेते नारायण राणे व आमदार नितेश राणे यांनी राम कदम यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाणे गाठलं.  पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर राम कदम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ” हा संघर्ष थांबणार नाही, येणाऱ्या काळात लोकं महाराष्ट्र सरकारचा विरोध करत रस्त्यांवर उतरतील” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.