रेल्वे रुळ पाण्याखाली बुडालेले असताना त्यावरुन ट्रेन चालवण्याचे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध आहे का ? उद्या पाण्यात बुडालेल्या ट्रॅकवरुन बुलेट ट्रेन चालवणार आहात का ? असा खोचक टोला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीत लगावला. दक्षिण मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष स्मिता मयांक ध्रुव यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश नरेश पाटील आणि न्यायाधीश गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने रेल्वेला महत्वाचे निर्देश दिले.

उपनगरीय रेल्वे प्रवाशांना रोजच्या रेल्वे प्रवासात ज्या समस्यांचा सामना करावा लागतो त्यावर उपाय शोधण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी संयुक्त बैठक करावी असा सल्ला दिला. पावसाळयाच्या काळात उपनगरीय प्रवाशांच्या त्रासामध्ये भर पडते. रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे अनेक ट्रेन्स रद्द होतात.

केंद्र सरकारच्यावतीने यावेळी न्यायालयात उपस्थित असलेले अॅडिशन सॉलिसिटर जनरल अनिल सिंह म्हणाले कि, दोन्ही मार्गावरच्या महाव्यवस्थापकांची बैठक लवकरच बोलवली जाईल. रेल्वे पूल, फुट ओव्हर ब्रिज, प्लॅटफॉर्मची उंची, महिला सुरक्षा या सर्व मुद्यांवर सखोल चर्चा केली जाईल. अधिक सुधारणा करण्यासाठी विचार मंथन केले जाईल. अंधेरीत पूल कोसळल्याच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपनगरीय मार्गावरील सर्व रेल्वे ब्रिजेसचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा सल्ला दिला.