News Flash

मुंबईत महिला बचत गटांसह इस्कॉनला दंड : माध्यान्ह भोजनातील ७८ टक्के खिचडीचे नमुने निकृष्ट

विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन म्हणून देण्यात येणाऱ्या खिचडीपैकी ७८ टक्के नमुन्यांमध्ये आवश्यक पातळीपेक्षा कमी प्रथिने आणि उष्मांक (कॅलरी) असल्याचे पालिकेच्या प्रयोगशाळामध्ये दिसून आले आहे.

| July 24, 2013 03:24 am

विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन म्हणून देण्यात येणाऱ्या खिचडीपैकी ७८ टक्के नमुन्यांमध्ये आवश्यक पातळीपेक्षा कमी प्रथिने आणि उष्मांक (कॅलरी) असल्याचे पालिकेच्या प्रयोगशाळामध्ये दिसून आले आहे. केंद्र सरकारने नमूद केलेल्या गुणवत्तेप्रमाणे खिचडी न पुरवल्याने ‘इस्कॉन’सह महिला बचत गटांनाही दंड ठोठावण्यात आला आहे.
पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जून २०१२ ते मार्च २०१३ दरम्यान शाळांमध्ये पाठवण्यात आलेल्या खिचडीच्या ३२५ नमुन्यांची पालिकेच्या प्रयोगशाळेत चाचणी केली. त्यापैकी २५१ नमुन्यांमध्ये ठरवून दिलेल्या पातळीपेक्षा कमी प्रथिने आणि उष्मांक होते. अशी खिचडी पुरवणाऱ्या बचत गटांना प्रत्येक नमुन्यामागे दोन हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. वर्षभरात तपासण्यात आलेल्या नमुन्यांपैकी खिचडीचे नऊ नमुने इस्कॉनचेही होते. त्यातील सहा नमुने केंद्र सरकारच्या निकषात बसत नसल्याने इस्कॉनलाही १२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सर्व शाळांमध्ये इस्कॉनप्रमाणे उत्तम दर्जाची खिचडी देण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकघराची कल्पना मुंबई पालिकेने उचलून धरली आहे. अशावेळी इस्कॉनच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह लावण्यात आले आहे. खिचडीच्या दर्जासोबतच ती वेळेत न पोहोचवणे, एखाद्या दिवशी खिचडी पुरवण्यात हयगय करणे, खिचडी अयोग्य असल्याने शाळेनेच ती नाकारणे या कारणांबाबतही बचत गटांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
‘सामाजिक देणग्यांमधील पैसे खर्च करून आम्ही चांगल्या दर्जाची खिचडी विद्यार्थ्यांना पुरवण्याचा प्रयत्न करतो. सरकारने पुरवलेला तांदूळ तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांमागे देण्यात येणाऱ्या तीन रुपयांमध्ये कडधान्य, भाजी खरेदी करून निकषांमध्ये बसणारी खिचडी तयार करण्याची प्रक्रिया पालिकेने सांगावी, त्यानुसार आम्ही खिचडी बनवतो,’ असे इस्कॉनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राधाकृष्ण दास म्हणाले.

दृष्टिक्षेपात माध्यान्ह भोजन..
* या योजनेनुसार खिचडीसाठी तांदूळ मोफत पुरवण्यात येतो.
* सरकारच्या निकषानुसार, पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १०० ग्रॅम कच्च्या तांदुळासोबत कडधान्य किंवा डाळीसारखा पूरक पदार्थ मिसळून ४५० ग्रॅम
उष्मांक आणि १२ ग्रॅम प्रथिने मिळणे आवश्यक आहे.
* सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना १५० ग्रॅम तांदुळासह पूरक पदार्थ मिसळून ७०० ग्रॅम उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिने मिळतील, अशा प्रकारे खिचडी तयार करण्याचे निकष ठरवून दिले आहेत.
* महापालिकेच्या शाळांमधील साडेतीन लाख विद्यार्थ्यांसाठी ३३३ महिला गट तसेच इस्कॉनकडून खिचडी पुरवली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 3:24 am

Web Title: iskcon food relief foundation fine for not providing nutritious food
Next Stories
1 पालिकेतील गहाळ फायलींचा छडा लावणार
2 बदलत्या विज्ञान प्रसारासाठी ‘आकाशवाणी’ सशक्त माध्यम
3 अंधश्रद्धा निर्मूलन समितीला परदेशातून पैसा?
Just Now!
X