मुंबई : करोनाच्या सौम्य लक्षणांसह आता अतिमध्यम आणि लक्षणे दिसून येण्यापूर्वीची अवस्था असलेल्या रुग्णांचेही घरातच विलगीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य विभागाने घेतला आहे. विलगीकरणाची सुधारित नियमावली विभागाने जाहीर केली.

करोनाचा संसर्ग झाला तरीही कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे नियमावलीत सुधारणा केल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

लक्षणे नसलेल्या आणि सौम्य स्वरूपाची लक्षणे असलेल्या रुग्णांचे घरात विलगीकरण केले जात होते. परंतु आता नव्या नियमावलीनुसार, यात अतिमध्यम स्वरूपाची लक्षणे असलेले आणि लक्षणे दिसून येण्यापूर्वीची स्थिती असलेल्या रुग्णांचाही समावेश केला आहे.

घरामध्ये रुग्णाला स्वतंत्र राहण्यासाठी सुविधा आणि २४ तास काळजी घेण्यासाठी व्यक्ती उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच डॉक्टरांनीही लक्षणांनुसार घरात विलगीकरण करण्यास संमती देणे गरजेचे आहे. घरात विलगीकरण केलेल्यांची स्थानिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी दररोज तापमान, नाडी, ऑक्सिजनची पातळीबाबत तपासणी केली पाहिजे. नियंत्रण कक्षामधूनही  फोनवरून रुग्णाची वैद्यकीय स्थिती दररोज जाणून घेणे गरजेचे आहे. यासोबतच कुटुंबातील इतर व्यक्तींच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाणे अपेक्षित आहे.

यांचे घरात विलगीकरण करू नये

एचआयव्ही, प्रत्यारोपण  करण्याची गरज असलेले रुग्ण, कर्करोगाचे उपचार सुरू असलेले रुग्ण आदी, ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते, अशांचे घरात विलगीकरण करू  नये.

वैद्यकीय मदत केव्हा?

श्वास घेण्यास त्रास, ऑक्सिजनची पातळी ९५ टक्क्यांपेक्षा कमी होणे, छातीत सतत दुखणे, आकडी येणे किंवा बोलता न येणे, चेहरा किंवा ओठ निळे पडणे इत्यादी लक्षणे जाणवल्यास तातडीने करोना आरोग्य केंद्रातून मदत घ्यावी.

विलगीकरणातून मुक्त

लक्षणे नाहीशी झाल्यापासून दहा दिवसांनी आणि मागील तीन दिवस ताप नसल्यास रुग्ण करोनामुक्त झाल्याचे म्हणता येईल. त्यानंतर सात दिवस रुग्णाने घरात विलगीकरणात राहावे. घरातील विलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर करोना चाचणीची आवश्यकता नाही.