गृहविलगीकरणाचे पालन होत नसल्याने पालिकेचा निर्णय; बोरिवलीतील करोना नियंत्रणासाठी कडक पावले

मुंबई : उत्तर मुंबईतील आर मध्य म्हणजे बोरिवली विभागातील वाढता करोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी उच्चभ्रू सोसायटीमध्ये आता तरुणांनाही घरी विलगीकरण करण्यास परवानगी न देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे ६० वर्षांवरील बाधितांसह तरुण वयोगटातील रुग्णांनाही पालिकेच्या विलगीकरण केंद्रामध्ये जाणे आवश्यक असेल.

बोरिवलीत झोपडपट्टय़ांच्या तुलनेत उच्चभ्रू सोसायटय़ांतील रुग्णसंख्या जवळपास चौपट आहे. असंशयित, सौम्य आणि मध्यम लक्षणे असलेल्या करोनाबधितांना घरीच विलगीकरणाची परवानगी दिली जाते. याचा फायदा घेत उच्चभ्रू सोसायटीमध्ये बहुतांश रुग्णांचे घरीच विलगीकरणात राहण्याकडे कल आहे. परंतु विलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे.

बोरिवलीत ३१५७ रुग्ण उच्चभ्रू सोसायटीमध्ये आढळून आले आहेत. यातील बहुतांश जणांना घरीच विलगीकरणाची परवानगी दिली गेली. परंतु विलगीकरणाचे नियम न पाळल्याने यांच्या संपर्कात आलेल्या १९६४ जणांना काही दिवसांनी बाधा झाल्याचे निदर्शनास आले. एका इमारतीमध्ये एक रुग्ण आढळल्यास काही दिवसांनी त्याच इमारतीत अनेक रुग्ण सापडल्याचेही दिसून आले. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी होत नसल्याचे यावरून स्पष्ट होते. यासाठी आता तरुण वयोगटातील लक्षणे असलेल्या किंवा नसलेल्या रुग्णांनाही आम्ही मागील तीन ते चार दिवसांपासून पालिकेच्या करोना कें द्रांमध्ये दाखल होण्यास सांगत असल्याचे विभागीय साहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी सांगितले.

घरामध्ये ६० वर्षांवरील व्यक्ती असेल तर तरुण वयोगटातील बाधितापासून संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे अशा घरामध्ये आम्ही तरुणांना विलगीकरणाची परवानगी देत नाही. विभागात सीसीसीमध्ये ५० टक्क्यांहून अधिक खाटा रिक्त आहेत. तेव्हा रुग्णांना के ंद्रामध्ये ठेवण्याची पूर्वीइतकी अडचण नाही. संसर्ग प्रसार रोखण्यासाठी हे गरजेचे असल्याचेही कापसे यांनी स्पष्ट केले.