चेंबूरच्या विष्णूनगर परिसरातील प्रकार

मुंबई : करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पालिका सध्या मिळेल त्या जागी विलगीकरण कक्ष उभारत असून संशयित रुग्णांना काही ठिकाणी अस्वस्छता, गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. चेंबूरच्या विष्णूनगर परिसरात पालिकेने अनेक वर्षे पडीक असलेल्या इमारतींमध्ये विलगीकरण कक्ष उभारला आहे. मात्र या इमारतींची इतकी दुरवस्था झाली आहे की, रुग्णांच्या नातेवाईकांना मोठय़ा अडचणींचा सामना करावा लागत आहे.

इतर शहरांच्या तुलनेत मुंबईत मोठय़ा झपाटय़ाने करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पालिकेसह सर्वच यंत्रणांवर मोठा ताण पडत आहे. घरातील एका व्यक्तीला करोनाची लागण झाल्यानंतर, त्याच्या घरातील इतर कुटुंबीयांना विलगीकरण कक्षात ठेवावे लागते. सुरुवातीला पालिकेने शहरातील अनेक हॉटेल ताब्यात घेत, त्यामध्ये हे कक्ष उभारले. मात्र दिवसेंदिवस रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची संख्या वाढतच असल्याने, ही हॉटेल देखील अपुरी पडू लागली आहेत. त्यामुळे पालिकेने अनेक ठिकाणी वर्षांनुवर्षे पडीक असलेल्या इमारती ताब्यात घेतल्या असून यामध्ये विलगीकरण कक्ष उभारले आहेत.

चेंबूर परिसरात देखील मोठय़ा संख्येने करोनाचे रुग्ण वाढत आहेत. संशयित रुग्णांकरिता पालिकेने विष्णुनगर येथे असलेल्या काही पडीक इमारतींमध्ये विलगीकरण कक्ष उभे केले आहेत. या इमारती अनेक वर्षे बंद होत्या. त्यामुळे त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पालिके ने कंत्राटदाराकडून  तात्पुरती साफसफाई करून या इमारतींचा ताबा पालिकेला दिला आहे. मात्र अजूनही येथे घाणीचे साम्राज्य आहे. पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

शौचालयांची अवस्था वाईट आहे. येथे राहणारे संशयित वारंवार पालिके कडे याबाबत तक्रोर करत असतात. मात्र पालिके कडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप विलगीकरण कक्षात असलेल्या एका इसमाने केला आहे.