महाराष्ट्रातील नवीन भाजप सरकारच्या सहकार्याने राज्यातील शेती, जलसंधारण, सुरक्षा आणि पुनप्र्रक्रिया क्षेत्रात काम करण्यास इस्रायल सरकार उत्सुक असल्याचे इस्रायलचे वाणिज्यदूत डेव्हिड अकोव्ह यांनी म्हटले आहे.
डेव्हिड अकोव्ह यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी सीरियातील परिस्थिती, इराक, आखाती देशांमधील सद्य:स्थिती, आयसीस या दहशतवादी संघटनेचा उदय, खनिज तेलाच्या दरातील घट यांसारख्या जागतिक भूराजकीय घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाच्या विषयांवर मतप्रदर्शन केले.
महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रातही काम करण्यास इस्रायल उत्सुक असून इस्रायलमधील सहा विद्यापीठांचे शिष्टमंडळ डिसेंबर महिन्यात मुंबई व पुण्याला भेट देतील.
भारतातील विद्यापीठांशी सहकार्य करार करून गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा आमचा मानस आहे, असेही अकोव्ह यांनी सांगितले.
भारत व इस्रायल यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होत आहेत. भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा इस्रायल दौरा सुरू झाला आहे. अशा दौऱ्यांमुळे दोन्ही देशांतील सहकार्य आणखी वाढेल, असेही त्यांनी नमूद केले.