इस्रोच्या बंगळुरु केंद्रात बसून ‘चांद्रयान २’ चंद्रावर उतरताना पाहण्याची संधी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. मात्र यासाठी केंद्र सरकारने आयोजित केलेली प्रश्नमंजुषा स्पर्धा विद्यार्थ्यांनी जिंकणे आवश्यक आहे.

अवकाश संशोधनाबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी या प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन सरकारने केले आहे. १० मिनिटांत म्हणजेच ६०० सेकंदांत २० प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनी द्यायची आहेत. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देणारे विद्यार्थी विजेते ठरतील.

या विद्यार्थ्यांना ७ सप्टेंबरला इस्रोच्या केंद्रात हजर राहून ‘चांद्रयान २’ चंद्रावर उतरतानाचा अनुभव प्रत्यक्ष घेता येणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा हजर असणार आहेत.

एका विद्यार्थ्यांला एक दाच स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धा सुरु झाल्यानंतर मध्येच थांबवता येणार नाही. पालक विद्यार्थ्यांना प्रश्नाचा अनुवाद करुन सांगू शकतात, मात्र उत्तरे लिहिण्यास मदत करु शकत नाहीत. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांचे नाव, पत्ता असलेले सरकारी ओळखपत्र आणि स्पर्धक हा शाळेचा विद्यार्थी असल्याचे संबंधित शाळेचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे, असे कळवण्यात आले.

२० ऑगस्टपर्यंत सहभागाची संधी

विद्यार्थ्यांना २० ऑगस्ट पर्यंत स्पर्धेत सहभागी होता येईल. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून २ विजेते निवडले जाणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी   ँ३३स्र्२://०४्र९.े८ॠ५.्रल्ल/०४्र९/ल्ल’्रल्ली—२स्र्ूंी—०४्र९/  या संकेतस्थळावर आपले खाते उघडावे.