06 March 2021

News Flash

लोकसत्ता वृत्तवेध : मतांसाठी ‘माधव’, ‘मामुली’, ‘खाम’.. 

भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या मेळाव्यात पंकजाताईंनी वंजारी समाजाला साद घातली.

भगवानगडाच्या पायथ्याशी दसऱ्याला ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शक्तिप्रदर्शन केले. 

भगवानगडाच्या पायथ्याशी दसऱ्याला झालेल्या मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करताना ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आपणच इतर मागासवर्गीय समाजाच्या नेत्या असल्याचे चित्र निर्माण केले आहे. छगन भुजबळ यांची रुग्णालयात जाऊन घेतलेली भेट, महादेव जानकर यांना मेळाव्यात दिलेले महत्त्व यातून ‘माळी, धनगर, वंजारी’ (माधव) हा प्रयोग पुन्हा रुजविण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू झाल्याचे स्पष्ट होते.

जनसंघ व पुढे भाजपमध्ये अन्य जाती-जमातींना सामावून घेण्याच्या उद्देशाने वसंतराव भागवत यांनी ‘माधव’चा प्रयोग राबविला होता. जनसंघ किंवा भाजप हा पांढरपेशांचा पक्ष, अशी टीका होत असे. सर्व समाजात पक्षाला स्थान मिळावे म्हणून वसंतराव भागवत यांनी जाणीवपूर्वक हा प्रयोग केला होता. त्याचा पुढे भाजपला राजकीय लाभही झाला. गोपीनाथ मुंडे यांनी माळी, धनगर, वंजारी आदी जातींची मोट बांधण्यावर भर दिला. मुंडे यांच्यामुळे वंजारी समाज एकगठ्ठा भाजपच्या मागे उभा राहिला. धनगर समाजाला बरोबर घेण्यावर मुंडे यांनी भर दिला होता. माळी समाजाने छगन भुजबळ यांना साथ दिली. भुजबळ तुरुंगात गेल्याने त्यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का बसला. एकनाथ खडसे यांना सत्तेचा दुरुपयोग केल्याने राजीनामा द्यावा लागला. धनंजय मुंडे हे आव्हान देण्याचा प्रयत्न करीत असले तरी राष्ट्रवादीत असल्याने भुजबळांप्रमाणेच धनंजय मुंडे यांच्यावर साहजिकच मर्यादा येतात. या पाश्र्वभूमीवर इतर मागासवर्गीय समाजाच्या नेत्या म्हणून पुढे येण्याचा पंकजाताईंचा प्रयत्न आहे.

भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या मेळाव्यात पंकजाताईंनी वंजारी समाजाला साद घातली. धनगर समाजाचे नेते आणि दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांना बरोबर घेतले. जानकर यांनी पंकजाताईंचे नेतृत्व मान्य करीत भविष्यात भाजपबरोबर असलो वा नसलो तरी पंकजाताईंबरोबर आहोत, अशी ग्वाही दिली. उपचाराकरिता रुग्णालयात हलविण्यात आल्यावर पंकजाताईंनी जे. जे. रुग्णालयात जाऊन भुजबळ यांची भेट घेतली होती.

‘माधव’चा प्रयोग भाजपकडून केला जात असतानाच १९९५च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्याच्या राजकारणात ‘मामुली’चा प्रयोग गाजला होता. लातूर विधानसभा मतदारसंघात तत्कालीन मंत्री विलासराव देशमुख तेव्हा निवडणूक लढवीत होते. तेव्हा मारवाडी, मुस्लीम आणि लिंगायत असा ‘मामुली’चा प्रयोग करण्यात आला. हे तिन्ही समाज विलासरावांच्या विरोधात गेले आणि जनता दलाच्या शिवाजी कव्हेकर यांनी विलासरावांचा पराभव केला होता.

१९८०च्या दशकात गुजरातमध्ये सत्तेच गणित जुळवून आणण्याकरिता माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोळंकी यांनी ‘खाम’चा प्रयोग केला होता. क्षत्रिय, हरिजन, आदिवासी आणि मुस्लीम (खाम) अशा समाजांची मोट सोळंकी यांनी तेव्हा बांधली आणि काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळाली होती. हा प्रयोगही देशभर गाजला होता. यातून गुजरातमधील पटेल हा मोठा समाज मात्र काँग्रेसपासून दुरावला आणि भाजपच्या जवळ गेला.

पंकजाताईंपुढे आव्हान

इतर मागासवर्गीय समाजाचा चेहरा म्हणून नेतृत्व करण्याचा पंकजा मुंडे यांचा प्रयत्न असला तरी त्यांच्यापुढे आव्हाने अनेक आहेत. स्वत:च्या भाजपकडून त्यांना किती मुक्त वाव मिळतो यावरही बरेच अवलंबून आहे. प्रमोद महाजन यांचे पाठबळ आणि पक्षाची ताकद यातून मुंडे यांना मुक्त वाव मिळाला होता. पंकजाताईंना तेवढे स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता कमी आहे.

भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या मेळाव्यात पंकजाताईंनी वंजारी समाजाला साद घातली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचा सुप्त संघर्ष सुरू असतो. त्यातूनच मध्यंतरी पंकजाताईंकडील जलसंधारण खाते काढून घेण्यात आले. ‘जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच’ या विधानामुळेही पंकजाताई मागे अडचणीत आल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 2:54 am

Web Title: issue of pankaja munde speech on dasara from bhagwangad
Next Stories
1 सेवाभावाला आश्वासक पाठबळ
2 मुंबईकरांना वीजदिलासा!
3 एका घरावर दुसरे घर मोफत !
Just Now!
X