सोमवारी 18 जून रोजी मुंबईकरांनी गेल्या दोन वर्षांतली सगळ्यात शुद्ध हवा अनुभवली असल्याचे समोर आले आहे. शनिवार – रविवारी पडलेल्या पावसामुळे मुंबईवरचे प्रदुषणाचे ढग हटले आणि शुद्ध मोकळा श्वास मुंबईकरांना घेता आला. एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग अँड रीसर्च (सफर) या संस्थेने एअर क्वालिटी इंडेक्स किंवा हवेच्या दर्जाचा निर्देशांक (एक्युआय) 18 इतका नोंदवला. जून 2015 पासून प्रदुषणाची नोंद करण्यात येत असून आत्तापर्यंतची सगळ्यात सुरक्षित व शुद्ध हवा दाखवणारा हा निर्देशांक आहे. शंभर या अंकाकाली असलेली हवा चांगली या सदरात मोडते. याच कालावधीत पुण्यातही 52 इतक्या समाधानकारक निर्देशांकाची नोंद झाली आहे. पुण्याची व मुंबईची हवा दिल्ली व अहमदाबादच्या हवेपेक्षा खूपच शुद्ध असल्याचे या दिवशी जाणवले आहे.

ऑक्टोबर 2017मध्ये सफरने 32 एक्युआय नोंदवला होता, जो शुद्ध हवेच्या बाबतीतला आत्तापर्यंतचा विक्रमी स्तर होता. रविवारी मुंबईकरांना तुलनेने जास्त प्रदुषित हवेचा सामना करावा लागला होता, कारण त्यादिवशी हा निर्देशांक 52 होता. मात्र त्या दोन दिवसांत पडलेल्या समाधानकार पावसाचा परिणाम सोमवारी बघायला मिळाला कारण हा निर्देशांक 52 वरून 18 वर आला आणि दोन वर्षांमधलं सगळ्यात कमी वायू प्रदूषण या दिवशी झाल्याची नोंद झाली. सफरनं या घटनेचं वर्णन एंजॉय द डे या सार्थ शब्दांमध्ये केलं.

हवेमधल्या असलेल्या प्रदुषित घटकांवरून हवेची शुद्धता तपासली जाते. हे प्रदुषित घटक पावसामुळे वाहले जातात. परंतु यावेळच्या पावसात आणखी एका घटकाचा सहभाग होता, तो म्हणज सोसाट्याच्या वाऱ्याचा. मुंबई शहरानं तुफान पाऊस तर अनुभवलाच शिवाय जोरदार वारेही यावेळी वाहत होते. सोमवारी सकाळीही वाऱ्याने वेग पकडला होता. त्यामुळे पावसातही हवेत राहिलेले उरलेसुरले प्रदुषित कण अरबी समुद्राच्या दिशेने आलेल्या जोरदार वाऱ्यानं उडवून लावले आणि शहराची हवा ताजी तवानी व शुद्ध केली, असे सफरचे प्रकल्प संचालक गुफ्रान बेग यांनी सांगितले. मुंबईमधल्या 10 ठिकाणी हवेची चाचणी केली जाते त्यापैकी वरळी व नवी मुंबई या दोन ठिकाणी हा निर्देशांक 10 पेक्षाही कमी होता. तर सगळ्यात जास्त म्हणजे 29 इतका कुलाबा व बोरिवली येथे नोंदवला गेला.

सफर नोंदवत असलेल्या चार शहरांमध्ये मुंबईची हवा सगळ्यात जास्त शुद्ध असल्याचे सोमवारी आढळले. प्रदुषण मापनाचा हा एक्युआय निर्देशांक दिल्लीमध्ये 159, अहमदाबादमध्ये 140 व पुण्यात 45 नोंदवला गेला. त्यामुळे पुणेही चांगली हवा या प्रकारात येत असून दिल्ली व अहमदाबाद वाईट सदरात येत आहेत. अर्थात हे सुख कायम राहणार नसून प्रदुषणाची पातळी नंतर वाढेल परंतु तरीही संपूर्ण पावसाळ्यात ती 100 त्या खाली म्हणजे चांगली हवा या सदरात राहील असा विश्वास सफरनं व्यक्त केला आहे.