मुंबईतील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, विरोधकांकडून त्यावरून टीका केली जात आहे. विरोधकांकडून सातत्यानं मुंबईवर होत असलेल्या टीकेचा राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. करोनातून बरं झाल्यानंतर घरी परतलेल्या आव्हाड यांनी “मुंबईला आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम केलं जात आहे,” असा आरोप केला आहे.

करोनामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबई मागील दीड महिन्यांपासून ठप्प आहे. मुंबईतील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या १२ हजारांच्या वर पोहोचली असून, दिवसेंदिवस त्यात भरच पडत आहे. केंद्र सरकारनंही मुंबई आणि महाराष्ट्रातील स्थितीविषयी चिंता व्यक्त केली आहे. दुसरीकडं करोनावरून राजकारणारही सुरू असल्याचं चित्र राज्यात दिसत आहे. मुंबईतील परिस्थितीवरून विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे.

आव्हाड यांनी ट्विट करून मुंबईतील स्थितीवरून सुरू असलेल्या राजकीय आरोपांवर भाष्य केलं आहे. “आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईला बदनाम करण्याचा कट पद्धतशीरपणे रचला जात आहे, हे दिसून येतंय. मुंबईचा लचका तोंडण्यासाठी टपून बसलेले लोक अजूनही या देशात आहेत आणि त्यांचं घर आपल्या बाजूलाच आहे,” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. आजारामुळे ते राजकारणापासून दूर होते. त्यांनी करोनावर यशस्वीपणे मात केली. रविवारी ते रुग्णालयातून घरी परतले होते. त्यानंतर पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड सरकार आणि राजकारणामध्ये सक्रिय झाले आहेत.