‘मला नोकरीची गरज होती. मी इथे रुजू झाले आणि ही देवाची सेवा आहे, अशी माझी खात्री पटली. रस्त्यावर भरकटलेल्या, मायेला पारखे झालेल्या आणि समाजापासून दुरावलेल्या मुलांना पुन्हा माणसात आणण्याचं काम इथे गेली आठ वर्षे सुरू आहे. आजवर सुमारे सहा हजार भरकटलेल्या मुलांना पुन्हा आपलं घर मिळालं, आईबापांची मायेची सावलीही मिळाली. घर सोडून आलेल्या मुलांनी आयुष्यात कधीही भीक मागू नये, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही समाजासमोर हात पसरतोय.. सध्या मी फक्त आठ तास काम करतेय. ज्या दिवसापासून चोवीस तास झोकून देता येईल, तेव्हा आपण खरे जगलो याचं समाधान मला मिळेल’.. ठाण्याच्या दादोजी कोंडदेव क्रीडासंकुलातील एका लहानशा गाळ्यात ‘समतोल फाऊंडेशन’च्या कार्यालयात काम करणाऱ्या ममता गांधींचे हे उद्गार..
आईबापाची मारहाण आणि भांडणं यांना विटून घर सोडून आठ दिवस राजस्थान, बिहार भटकत मुंबईत आलेल्या दहाबारा वर्षांच्या एका मुलास ज्या दिवशी समतोलच्या कार्यकर्त्यांनी इथे आणलं, त्याच दिवशी, इथल्या दीडदोन महिन्यांच्या वास्तव्यात मायेचा पाझर अनुभवल्याने घराची ओढ अनावर झालेला एक मुलगा इतर मुलांच्या साक्षीनं आईच्या कुशीत शिरला. ती भेटच हृद्य होती..
मुलगा घरातून नाहीसा झाल्यानंतर काही दिवस त्याच्या शोधासाठी शक्य ते सारे करूनही तो सापडला नाही, तेव्हा या आईने मुलाचा लहानसा फोटो मोठा करून आणला आणि हार घालून तो भिंतीवर टांगला. त्या दिवसापासून, त्या फोटोकडे पाहात दुखाचे कढ सोसणं हाच तिचा दिनक्रम झाला. अशाच एका दुपारी मुलाच्या फोटोसमोर आठवणींनी भिजलेल्या अनावर अश्रूंना वाट करून देत असताना दारात एक पत्र पडले, आणि मुलगा सुखरूप आहे, हे समजताच त्या तिच्या आनंदाला पारावर उरला नाही.. तिने नवऱ्यासोबत मुंबई गाठली, आणि अधीरतेने समतोलच्या कार्यालयात आली. व्यसनांच्या विळख्यात सापडून देहाचे हाल झालेल्या, जगण्याचे चटके सोसून नजर रापलेल्या त्या पोटच्या गोळ्याला पाहून तिच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तो मुलगाही आईला बिलगला.. हृदय हेलावून टाकणारं ते दृश्य पाहून त्या लहानशा खोलीचं सारं वातावरणच हेलावून गेलं..
असं दृश्य या कार्यालयात नेहमीच पाहायला मिळतं.. हा मुलगा घरी गेला, त्याच दिवशी इथे दोनतीन मुलं नव्यानं दाखल झाली होती. एका तिटकाऱ्याच्या तिरिमिरीत घर सोडून रस्त्यावर आल्याने भविष्यापुढील प्रश्नचिन्हाचीही जाणीव नसलेल्या त्या मुलांच्या मनात पुन्हा घराची ओढ उभी करण्याचं आव्हान समतोलच्या टीमनं स्वीकारलं होतं.. ते यशस्वी होणारच, आणि ही मुलंदेखील पुन्हा आपल्या घरी जाणार, असा विश्वास लीलाताईंच्या बोलण्यातून ओसंडत होता. कारण, अशा भरकटलेल्या सहा  हजार मुलांना त्यांनी पुन्हा आपलं घर मिळवून दिलं होतं..