देशात करोना जेवढ्या वेगाने पसरत आहे. तेवढ्याचं वेगाने राजकारण देखील होत आहे. करोना काळात देखील राजकारणाला उत आला आहे. करोना परीस्थितीवरून सत्ताधारी आणि विरोध सतत एकमेकांवर टीका करत आहेत. दरम्यान, राजकारण करणाऱ्यांना केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार नितीन गडकरी यांनी खडे बोलं सुनावले आहेत. रविवारी नागपूर कार्यकारिणी बैठकीत नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना साथीच्या प्रोटोकॉलचे पालन करण्याचे निर्देश दिले. तसेच यावेळी पक्षाने बरीच कार्यकर्ते गमावली आहेत, म्हणून प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे आणि समाजसेवा करताना राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. याचा हवाला देत आमदार रोहित पवार यांनी देखील भाजपाला सल्ला दिला आहे.

रोहित पवार म्हणाले, “कोविडची लढाई लढत असताना आजच्या अडचणीच्या काळात कुणीही राजकारण करू नये’, हा सन्माननीय नितिन गडकरी साहेबांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. ते देशातले मोठे नेते आहेत. माझ्यासारखे अनेकजण त्यांच्याकडून शिकत असतात. अपेक्षा आहे राजकारण करणारे, त्यांचा हा सल्ला मानतील!”

काय म्हणाले नितीन गडकरी</strong>

गडकरी म्हणाले, समाजसेवेत राजकारण करू नका कारण केवळ तुम्ही केलेल्या चांगल्या कामाचे श्रेय कार्यकर्त्यांसह भाजपाला जाईल. हा साथीचा रोग किती काळ टिकेल हे कोणालाही माहिती नाही, म्हणून आपण सर्वोत्कृष्ट विचार केला पाहिजे आणि सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहावे.

कार्यकर्त्यांना राजकारणाचा खरा अर्थ सांगताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, राजकारण म्हणजे केवळ सत्तेत राहणे नव्हे तर ते सामाजिक कार्य आणि राष्ट्रवाद आहे, ‘आपण जाती, धर्म किंवा पक्षाचा विचार न करता समाज आणि गरिबांच्या पाठीशी उभे राहून सर्वांना मदत केली पाहिजे.

भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला दिला होता घरचा आहेर

करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील विविध राज्यांत आरोग्य सुविधा कोलमडल्याचं दृश्य आहे. वेळेत उपचार मिळत नसल्याने रुग्णांचे जीव जात असून, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांकडून केंद्र सरकारला फटकारलं जात आहे. देशातील करोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सूत्रे देण्याचा सल्ला भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला दिला होता. मात्र, त्याची सरकारकडून कोणतीही दखल घेतली गेली नाही.

त्यानंतर शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने देशातील ऑक्सिजन वितरण प्रणालीसंदर्भात १२ सदस्यीय समिती नियुक्त केली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर स्वामी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. स्वामी यांनी ट्विट करत सरकारला घरचा आहेर दिला. “जर मोदींनी गडकरींबद्दलचा प्रस्ताव स्वीकारला असता, तर करोनाविरोधातील लढाई सरकारच्या नियंत्रणात असती. आता सर्वोच्च न्यायालयाने एक समिती नियुक्त केली आहे. त्या प्रस्तावावर सॉलिसिटर जनरलने आत्मसमर्पणच केलं. एका लोकशाही देशात हा आदेश सरकारविरोधी आहे,” अशी टीका स्वामी यांनी केली आहे.