मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या कंगना रणौतला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवणं ही बाब धक्कादायक आहे असं वक्तव्य महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे. महाराष्ट्र हा काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांचाच नाही तर भाजपाचा आणि अवघ्या जनतेचा आहे. मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांचा सगळ्याच पक्षांनी निषेध नोंदवायला हवा असंही अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “अनेकजण इतर प्रांतातून महाराष्ट्रात येतात, काही ऋण मानतात काही मानत नाहीत”

आणखी वाचा- “कंगनाला महाराष्ट्राचे गृहमंत्री धमकावत आहेत, हे खपवून घेतलं जाणार नाही”

काही दिवसांपूर्वीच कंगना रणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना यांच्यात ट्विटर वॉरही रंगलं होतं. दरम्यान मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे कुणाची हिंमत असेल तर अडवा असं आव्हानही कंगनाने दिलं  आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर वाद रंगलेला असताना केंद्राने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा पुरवली. ज्यानंतर कंगनाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभारही मानले आहेत. अशा सगळ्यात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र ही बाब धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे.

आणखी वाचा- देवेंद्र फडणवीस म्हणाले, कंगनाशी सहमत नाहीये, पण…

मागच्या काही आठवड्यांपासून बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक वादावादी सुरु आहे. तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केल्यामुळे तिच्यावर राजकीय तसेच कला क्षेत्रातून प्रचंड टीका करण्यात आली. कंगना रणौतचा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याबरोबर शाब्दिक वाद चांगलाचा रंगला आहे.