गुजरातच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी राहुल गांधींची भेट घेणे टाळले ही माझी मोठी चूक होती. अन्यथा भाजपाला आम्हाला सत्तेपासून दूर ठेवता आले असते, असे पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने म्हटले आहे. मुंबईत आयोजित इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये तो बोलत होता.

हार्दिक म्हणाला, ममता बॅनर्जी, नितीश कुमार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मी जाहीरपणे भेट घेऊ शकतो तशी राहुल गांधी यांची देखील घेण्यात काहीही अडचण नव्हती. मात्र, ही भेट मी जाणीवपूर्वक टाळली आणि याचाच फटका काँग्रेसला बसला. अन्यथा काँग्रेसला गुजरातमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले असते. तसेच भाजपाला आम्हाला सत्तेपासून दूर ठेवता आले असते.

राहुल गांधींची भेट टाळणं ही आपली सर्वात मोठी चूक ठरली कारण, ही भेट झाली असती तर भाजपाला वीस जागा कमी मिळाल्या असत्या. त्यांची संख्या ९९ वरुन ७९वर आली असती, असेही हार्दिक यावेळी म्हणाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका करताना हार्दिक म्हणाला, गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाने नरेंद्र मोदींचे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर केले. यावेळी त्यांनी अनेक आश्वासने दिली. त्यावेळी आम्हाला वाटले की, मोदींमुळे देशातील तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळेल, मात्र, ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत.