24 September 2020

News Flash

महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील करोना केंद्राची सामग्री हटवली

धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील करोना केंद्रातील सामग्री अखेरीस पालिकेने हटवली

मुंबई : धारावीतील महाराष्ट्र निसर्ग उद्यानातील करोना केंद्रातील सामग्री अखेरीस पालिकेने हटवली. येथील सामग्री खराब होण्याच्या मार्गावर असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने दिले होते.

महाराष्ट्र निसर्ग उद्यानात तात्पुरते करोना केंद्र उभारण्यात आले होते. मात्र धारावीतील रुग्णांची संख्या कमी झाल्यावर हे केंद्र बंद करण्यात आले. तसेच शिवाजी विद्यालय आणि राजीव गांधी स्पोर्ट क्लब येथील करोना केंद्रे बंद केल्यानंतर तेथील सामग्रीदेखील महाराष्ट्र निसर्ग उद्यान येथे जागा उपलब्ध असल्याने ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली.

निसर्ग उद्यानातील बंद केलेले केंद्र आणि इतर केंद्रांतील पुठ्ठय़ांच्या खाटा, नॉयलॉनच्या पट्टय़ा असलेल्या घडीच्या खाटा, गाद्या, उशा, ५५ स्नानगृहे आणि शौचालये आणि इतर सामग्री या निसर्ग उद्यानात ठेवण्यात आली होती.

या ठिकाणी असलेल्या खुल्या रंगमंचाच्या जागेत आणि तीन बाजूंनी बंदिस्त अशा उद्यानाच्या कार्यशाळा आदी कार्यक्रमासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेत ही सामग्री ठेवली होती. खुल्या रंगमंचाच्या ठिकाणी पुठ्ठय़ांच्या काही खाटा पावसामुळे पाण्याने लगदा होण्याच्या मार्गावर होत्या. या संबंधातील ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर लगेचच ही सामग्री तेथून हटवली गेली.

येथील सामग्री अन्य ठिकाणी नेल्याची माहिती पालिकेच्या जी उत्तर विभागाचे उपायुक्त साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली. तसेच या ठिकाणी प्राणवायूची सुविधा उभारण्यात आली नसल्याची माहिती पालिकेने दिली. ही सामग्री हटवली असून त्याचा वापर अन्य ठिकाणी गरजेनुसार केला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 2:37 am

Web Title: items of corona center in maharashtra nature park removed zws 70
Next Stories
1 बंगाली भाषकांची यंदा मूर्तिपूजेऐवजी घटपूजा
2 खासगी डॉक्टरांची मदत
3 करोनाच्या धास्तीने ‘शिवनेरी’कडे प्रवाशांची पाठ
Just Now!
X